Wrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा

Brijbhushan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जूनला भारतीय कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत दिल्ली पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 10, 2023, 06:16 PM IST
Wrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा title=

Brijbhushan Singh Vs Wrestlers: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी (India Wrestlers) आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हरियाणातल्या सोनीपतमध्ये (Hariana Sonipat) महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) निर्वाणीचा इशारा दिला आहे. हे सर्व प्रकरण निकाली निघेल, तेव्हाच आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) खेळू असं साक्षी मलिकने म्हटलं आहे. भारतीय कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांना पदावरुन हटवण्याबरोबरच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

ब्रिजभूषण यांच्याविरोधात 2 एफआयआर
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 2 एफआयआर दाखल केले आहेत. यातलं एक प्रकरण पॉक्सोअंतर्गत दाखल झालं आहे. सोनीपतमध्ये झालेल्या महापंचायतीत याविरोधात ठोस निर्णय घेण्यात आला आहे 15 जूनपर्यंत याप्रकरणात कोणताही निर्णय झाला नाही. तर पुढची रणनिती ठरवली जाईल आणि ती आक्रमक असेल असा ठरवण्यात आलं. ब्रिजभूषण यांना अटक करायला हवं, ते बाहेर राहिले तर भीतीचं वातावरण राहिल त्यामुळे त्यांना आधी अटक करा आणि नंतर तपास सुरु करा असं साक्षी मलिकने म्हटलंय. आम्ही सत्यासाठी लढत आहोत, काही जणं खोट्या बातम्या पसरवत असल्याचंही साक्षी मलिकने म्हटलंय.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने सरकारबरोबर बातचित सुरु असून ती चर्चा सार्वजनिक करणार नसल्याचं सांगितलंय. ज्या संघटना किंवा पंचायत आमच्याबरोबर आहेत, त्यांनाच याबद्दल माहिती दिली जाईल, पुढची सर्व रणनीती त्यानुसारच ठरलवी जाईल असं बजरंग पुनियाने सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार कुरुक्षेत्र आणि मुझफ्परनगरमध्येही भारतीय कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप महापंचायत आयोजित करण्यात आली होती. 

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7जूनला कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल होती. दिल्ली पोलिसांना 15 जूनपर्यंत चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. याशिवाय खेळाडूंवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआईआर मागे घेत असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय पंचांचा दावा
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पंच जगबीर सिंह यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. 2013 पासून बृजभूषण शरण सिंग यांची महिला कुस्तीपटूंबाबत अयोग्य वृत्ती अनेक प्रसंगी दिसून आली आहे असा दावा जगबीर सिंह यांनी केला आहे. ब्रिजबूषण यांना अनेक काळ ओळखतो. त्याच्याविरोधात मुलींना तक्रार दाखल केलीय, पण अद्याप काहीही कारवाई झालेली नाही, याचं दु:ख वाटतं असं जगबीर सिंह यांनी सांगितलं.