MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 30, 2023, 12:59 AM IST
MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास? title=
Indian Premier League 1000th Match

IPL 1000th Match: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजे क्रिकेट जगातील सर्वात श्रीमंत लीग. 2008 मध्ये सुरू झालेली लीग आता अनोख्या टप्प्यावर पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) तत्कालीन उपाध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डोक्यात क्रिकेट व्यवसायाला नव्या उंचीवर पोहचवण्याची कल्पना आली आणि इंडियन प्रिमियम लीगने जन्म घेतला. त्यामुळे आजही अनेक खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याची आणि छाप सोडण्याची संधी देखील मिळत आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामास धमाकेदार अंदाजात सुरूवात झालीये. अर्ध्याहून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यामुळे आता सामन्यांची चुरस आणखीच वाढल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलचा 42 वा सामना रंगतोय तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यामध्ये. मात्र, हा सामना दोन प्रकारे खास असणार आहे.

आयपीएलची 'ऐतिहासिक मॅच'

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 16 हंगामात 1000 सामने खेळवणारी आयपीएल ही पहिलीच लीग ठरणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा वाढदिवस (Rohit Sharma's Birthday) असल्याने देखील हा सामना खास राहिल.

आणखी वाचा - Rohit Sharma Birthday: कॅप्टनच्या बर्थडेला MI ने शेअर केला खास Video, 'हिटमॅन' नाव नाही तर...

ललित मोदींची आयपीएलची योजना बीसीसीआयने अमलात आणली  आणि बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ललित मोदींना 100 कोटींचा धनादेश दिला. त्याने क्रिकेटचे वारे फिरले.  फ्रँचायझीची लिलाव प्रक्रिया 24 जानेवारी 2008 मध्ये पार पडली. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2008 मध्ये पहिल्यांदा खेळाडूंचा लिलाव झाला. त्यानंतर आजवर आयपीएलने अनेक सुवर्णक्षण साजरे केले आहेत.

1000 व्या सामन्यानिमित्त खास कार्यक्रम

दरम्यान, या एतिहासिक क्षणानिमित्ताने बीसीसीआय एक छोटासा सोहळा आयोजित करणार आहे. हा संपूर्ण सोहळा फक्त 10-15 मिनिटे चालणार असल्याची माहिती मिळालीये. एक व्हिडिओ प्ले केला जाईल ज्यामध्ये काही खेळाडू आयपीएलबद्दल बोलतील. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रमांची सांगता होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.