Sports News : क्रिकेट जगतामध्ये जेव्हाजेव्हा मानधनाचा मुद्दा निघतो तेव्हातेव्हा मानधनाचा आकडा जाणताच अनेकांना धक्का बसतो. कारण कोणी विचारही केला नसेल इतकं मानधन फक्त खेळाडूच नव्हे, तर क्रिकेट समालोचक अर्थात कॉमेंटेटर्सही घेतात. क्रिकेट कॉमेंट्री क्षेत्रामध्ये सक्रिय असणाऱ्या आकाश चोप्रा यानं स्वत: याबद्दलचं वक्तव्य केलं आहे.
हिंदी क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये अतिशय मानानं नाव घेतलं जाणाऱ्या भारतीय संघातील माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा फक्त या एकाच क्षेत्रातून नव्हे, तर आता युट्यूबच्या माध्यमातूनही कमाई करताना दिसत आहे. हल्लीच एका पॉडकास्टमध्ये संवाद साधताना त्यानं बरीच अशी माहिती दिली, जी आतापर्यंत सहसा समोर आली नव्हती.
ज्युनिअर कॉमेंटेरना वरिष्ठांच्या तुलनेत किती पगार मिळतो? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत आकाशनं जे उत्तर दिलं त्यातून पगाराची एकूण रचना सर्वांसमोर आली. कॉमेंट्री करणाऱ्यांना प्रत्येक सामन्याच्या हिशोबानं पगार दिला जातो. यामध्ये ज्युनिअर कॉमेंटेटरना एका दिवसाचे 35 ते 40 हजार रुपये मिळतात तर, अनुभवी कॉमेंट्री करणाऱ्यांना एका दिवसाचे 10 लाख रुपयेही मिळतात, असं त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.
भारतीय खेळाडूंप्रमाणंच ही कॉमेंट्री करणारी मंडळीसुद्धा कमाल कमाई करतात हेच आकाशच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. या पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, 'भारतात क्रिकेट कॉमेंटेटर वर्षभरात सरासरी 100 दिवस कॉमेंट्री करतात. त्यामुळं त्यांची वर्षाला सरासरी कमाई 10 कोटी रुपये इतकी असू शकते. याशिवाय कॉमेंटेटर इव्हेंट आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही काम करतात, ज्या माध्यमातून त्यांची घसघशीत कमाई होते.' आपण कधीही कोणत्याही कॉमेंटेटरचा पगार विचारला नाही, असंही आकाश चोप्रानं स्पष्ट केलं. पण, तरीही आता कॉमेंट्री करणाऱ्यांचा एकंदर पगाराचा आकडा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.