भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी (विजयाच्या टक्केवारीनुसार) ठरला आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कर्णधार म्हणून आपल्या अंतःप्रेरणेवर आणि अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा वेळ घालवला आहे असं रोहित शर्मा म्हणाला आहे. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा व्हाईटवॉश केल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाचं आणि आक्रमतेचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
पावसामुळे दुसरा आणि तिसरा दिवस वाया गेल्यानंतरही भारतीय संघाने प्रत्येक ओव्हरला 8 च्या सरासरीने धावा करत हा सामना जिंकला. भारताने बांगलादेशचा 2-0 ने धुव्वा उडवल्यानंतर रोहितने BCCI.TV ला सांगितलं की, “मी मैदानात इतका वेळ घालवला आहे की, आता मी जो काही निर्णय घेतो त्यावर विश्वास ठेवू शकतो".
बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली, के एल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रोहितने आपण खेळाडूंकडून सल्ला घेण्यासाठी पूर्णपणे तयार असतो, पण अखेर आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवतो असं म्हटलं आहे.
"मैदानात मी जो काही निर्णय घेतो, त्यावर ठाम राहतो. मैदानात नक्कीच आजुबाजूला इतर खेळाडू असतात जे मला कधीही आणि कोणताही सल्ला देऊ शकतात. पण दिवसाच्या शेवटी मी माझ्या मनावर आणि निर्णयावर विश्वास ठेवतो. खेळताना याच गोष्टी महत्त्वाच्या असतात," असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहितने यावेळी संघाच्या क्षेत्ररक्षणावर समाधान व्यक्त केलं ज्यांनी 24 पैकी 23 झेल घेतले. पुढे तो म्हणाला की, "कदाचित कोणाचं दुर्लक्ष झालं असेल, परंतु मला नुकतेच कळवलं गेलं आम्हाला 24 झेलची संधी मिळाली आणि आम्ही त्यातील 23 घेतले. हे फार कौतुकास्पद आहे, कारण भारतात जिथे चेंडू स्लिपमध्ये हातात येत नाही, कारण ते नेहमीपेक्षा खूप पुढे उभे होते. प्रतिक्रिया वेळ खूपच कमी असल्याने झेल घेणं कठीण आहे".
रोहितने आक्रमक देहबोलीवर आपला विश्वास नसून आपली मैदानावरील कार्यशैली तशी नसल्याचं म्हटलं आहे. म्हणाला, "मला वाटते की माझ्यासाठी आक्रमकता ही कृतींबद्दल आहे. ती माझ्या प्रतिक्रियांबद्दल नाही. आम्ही ज्या प्रकारची फलंदाजी करतो, कोणत्या प्रकारची फील्ड पोझिशनिंग करतो. आम्ही ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, ती माझ्यासाठी आक्रमकता आहे," असं रोहित म्हणाला.
दरम्यान जेव्हा, मोहम्मद सिराज फलंदाजाशी बोलतो तेव्हा तो कदाचित त्याच्या मेंदूशी खेळत असतो त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही असंही रोहित म्हणाला. "सिराज, एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो मैदानावर सर्वकाही देतो. सपाट खेळपट्ट्यांवरही काहीही घडत नसताना, त्याला काहीतरी करायचं असतं. फलंदाजांशी बोलणं, त्याला अस्वस्थ करणं जेणेकरून संघ खेळात राहील यासाठी तो प्रयत्न करत असतो,” असं तो पुढे म्हणाला.