कोहलीमुळे मैदानात 'विराट' राडा! हेल्मेट आपटलं; जयसूर्यानेही श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून...

Virat Kohli Controversial Decision Vs Sri Lanka 2nd ODI: सोशल मीडियावर या निर्णयाची सध्या तुफान चर्चा असून फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 7, 2024, 09:27 AM IST
कोहलीमुळे मैदानात 'विराट' राडा! हेल्मेट आपटलं; जयसूर्यानेही श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून... title=
फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli Controversial Decision Vs Sri Lanka 2nd ODI:  भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेने भारताला धक्का दिला. भारताला 241 धावांचा यशस्वीपणे पाठलाग करता आला नाही. भारताचा डाव 208 धावांवर आटोपला. या सामन्यामध्ये विराट कोहलीसंदर्भातील एका निर्णयावरुन वाद निर्माण झाल्याने मैदानात तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. 

सगळेच वैतागले

विराट कोहलीला पायचित बाद देण्यात आल्यानंतर त्याने रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूनंतर विराटला नाबाद घोषित करण्यात आलं. मात्र ज्या पद्धतीने विराटला अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर नाबाद जाहीर करण्यात आल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंबरोबर त्याचा प्रशिक्षक असलेला सनथ जयसूर्यानेही ड्रेसिंग रुममधून थर्ड अम्पायरच्या निर्णयावर चांगलाच संताप व्यक्त केला. या निर्णयानंतर कॅमेरा जयसूर्यावर फोकस झाला तेव्हा तो फारच वैतागलेला दिसत होता.

विराट नाबाद घोषित

भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना सामन्यातील 15 व्या ओव्हरला हा प्रकार घडला. धनंजयाने टाकलेला ऑफ ब्रेक बॉल अपेक्षेपेक्षा अधिक फिरला. त्यामुळे बॅक फूटवर जाऊन लेग साईडला चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू विराटच्या पॅडला लागला. श्रीलंकन खेळाडूंनी अपिल केल्यानंतर विराटला बाद घोषित करण्यात आलं. विराटने लगेच रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूदरम्यान अल्ट्रा एजचा निकाल मोठ्या स्क्रीनवर दिसण्यास वेळ लागला.

नक्की वाचा >> Ind vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली

बॉल बॅटजवळून गेला तेव्हा अल्ट्रा एजमध्ये स्पाइक दिसून आला. याच आधारे तिसरे पंच जो विल्सन यांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलून कोहलीला नाबाद ठरवलं. स्क्रीनवर नॉट आऊट असं झळकल्यानंतर विराट हसला. मात्र दुसरीकडे श्रीलंकन संघातील खेळाडूंना या निकालावर विश्वास बसत नव्हता.

हेल्मेट जमीनीवर आपटलं

विराटला नाबाद जाहीर केल्यानंतर श्रीलंकन विकेट कीपर कुशल मेंडिसने संतापून आपलं हेल्मेट जमीनीवर आपटलं.

तर असलंकाने पंच रविंद्र विमालासीरी यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेचा प्रशिक्षक सनथ जयसूर्यानेही ड्रेसिंग रुममधून नाराजी व्यक्त केली. तो या बदलेल्या निर्णयाबद्दल चेहरा पाडून सहकाऱ्यांशी बोलताना दिसून आला. श्रीलंकन खेळाडू विराटला नाबाद देण्याच्या निर्णयावर मैदानातच चर्चा करु लागले. विराटला नाबाद दिल्याने ते फारच नाराज होते.

विराटला फायदा घेता आला नाही

मात्र विराटला या संधीचा मोठा फायदा घेता आला नाही. यानंतर चार ओव्हर झाल्या आणि विराट तंबूत परतला. जेफरी वेंडरसेने विराटला तंबूचा रस्ता दाखवला. चेंडू खेळून काढण्याच्या नादात तो पॅडला लागला आणि विराट पायचित झाला. विराटने 19 बॉलमध्ये 14 धावा केल्या. या मालिकेत दोन सामन्यानंतर श्रीलंकेने 1-0 ची आघाडी घेतली आहे.