IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत

Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2024, 12:57 PM IST
IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत title=

Sunil Gavaskar On Virat Kohli: भारत आणि इंग्लंडदरम्यान सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) कौटुंबिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. पण यानंतर त्याने उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नसू असं बीसीसीआयला (BCCI) कळवलं. विराट कोहली इतक्या महत्त्वाच्या मालिकेत गैरहजर असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यातील काहीजण कुटुंबाला प्राथमिकता दिल्याने कौतुक करत आहेत, तर काहीजण मात्र नाराजी जाहीर करत आहेत. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी उपहासात्मक विधान केलं आहे. 

रांचीत स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात सुनील गावसकर यांनी आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने सुनील गावसकर यांना विराट कोहली आयपीएल खेळणार की नाही? अशी विचारणा केली. यावर सुनील गावसकरांनी उत्तर दिलं की, "तो खेळणार का? काही कारणास्तव तो खेळत नाही आहे. कदाचित तो आयपीएलही खेळणार नाही".

विराट कोहली दुसऱ्यांदा वडील झाला आहे. अनुष्का गरोदर असल्यानेच त्याने इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. यानंतर उर्वरित तीन सामन्यांमधूनही त्याने माघार घेतली होती. के एल राहुल जखमी असल्याने विराट कोहली संघात पुनरागमन करेल असे अंदाज लावले जात होते. पण विराट कोहली उपलब्ध होऊ शकलेला नाही. 

दरम्यान विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकली आहे. रांचीमधील चौथा कसोटी सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. विराटसहित अनेक मोठे खेळाडू अनुपस्थित असतानाही भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. या मालिकेत नवख्या आणि तरुण खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यशस्वी जैसवाल, सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेत शाबासकी मिळवली आहे.

22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला मोठा ब्रेक मिळणार आहे. 11 मार्चला कसोटी मालिका संपणार आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत आयपीएल सुरु असेल. यानंतर भारतीय संघ थेट टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होईल. जून महिन्यात टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे.