'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'

रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते.   

शिवराज यादव | Updated: Oct 2, 2024, 04:05 PM IST
'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...' title=

भारताचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) गणना आता महान खेळाडूंमध्ये केली जाते. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आर अश्विन (R Ashwin) सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. यासह आर अश्विनने श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द सीरिज विक्रमाशी बरोबरी केली. 38 वर्षीय आर अश्विन जसजसं वय वाढेल त्यानुसार उत्तम कामगिरी करत आहे. आपल्या फिरकीच्या बळावर विरोधी संघाच्या खेळाडूंना अक्षऱश: नाचवत आहे. 

बांगलादेशविरोधातील कसोटी मालिकेत आर अश्विनने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या मालिकेतील कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आर अश्विनने हा सन्मान मिळवण्याची ही 11 वी वेळ होती. यासह आर अश्विनने श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. त्यालाही त्याच्या करिअरमध्ये 11 वेळा 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार मिळाला होता. न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिकेत आर अश्विनचा मुरलीधरनचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने नुकतंच श्रीलंकेचा 2-0 ने पराभव केला आहे.

बीसीसीआयचे माजी निव़डकर्ते साबा करीम भारत विरुद्ध बांगलादेशच्या दुसऱ्या कसोटी मालिकेत समालोचन करत होते. त्यांनी सामन्यानंतर आर अश्विनला तू 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार किती वेळा मिळाला याचा काही रेकॉर्ड ठेवतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर आर अश्विनने दिलेलं उत्तर भन्नाट होतं. "तुम्ही जणू काही मी सीरियल किलर आहे असं भासवत आहात, जो या सर्व गोष्टी ठरवून करतो. पण मी ठरवून कोणतीच गोष्ट करत नाही. खरं तर करिअरच्या एका टप्प्यावर मला या गोष्टींमुळे फरक पडत होता. पण आता मी फार पुढे आलो असून, जे काही येतं तो निकाल म्हणून समजून घेत ते स्विकारतो," असं आर अश्विन म्हणाला. 

"आम्ही सतत प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याबद्दल बोलतो, परिणामांवर नाही. पण नेमकी प्रक्रिया काय आहे हे आम्हाला सापडत नाही. मला आनंद आहे की मी ते कमी करू शकलो. मी त्या दिवशी जे काही करु शकलो त्याच्याशी माझा आनंद आणि परिणाम जोडला गेला. माझ्यासाठी खेळण्याचा सर्वात मोठा आनंद म्हणजे उद्या, परवा नेटमध्ये जाणे आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे. तोच खरा आनंद आहे. प्लेअर ऑफ द मॅच/मालिका पुरस्कार तो आनंद देईलच असं नाही. कारण जर तुम्ही तुमचा आनंद त्याच्याशी जोडत राहिलात तर मग तुम्ही फार काळ आनंदी राहू शकणार नाही," असं आर अश्विन म्हणाला.