नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे. भारतानं ठेवलेल्या २५१ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ४९.३ ओव्हरमध्ये २४२ रनवर ऑलआऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ रनची आवश्यकता होती. पण विजय शंकरनं पहिले धोकादायक मार्कस स्टॉयनिसची आणि मग ऍडम झम्पाची विकेट घेतली. मार्कस स्टॉयनिसनं ६५ बॉलमध्ये ५२ रन केले होते. याआधी बॅटिंग करतानाही विजय शंकरनं चमकदार कामगिरी केली होती. विराट वगळता इतर भारतीय बॅट्समनना अडचणी येत असताना विजय शंकरनं ४१ बॉलमध्ये ४६ रन केले होते.
भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि विजय शंकरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि केदार जाधवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसनं सर्वाधिक ५२ रन केले. तर पीटर हॅण्ड्सकॉम्बला ४८ रन करता आले. एरॉन फिंच (३७ रन) आणि उस्मान ख्वाजा (३८ रन) यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये ८३ रनची पार्टनरशीप झाली. पण ही पार्टनरशीप मोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सातत्यानं विकेट गेल्या.
तत्पूर्वी या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा ४८.२ ओव्हरमध्ये २५० रनवर ऑलआऊट झाला. विराटचं वनडे कारकिर्दीमधलं हे ४०वं शतक होतं. विराट कोहलीनं १२० बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोरचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी त्यांचा कर्णधार एरॉन फिंचचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवला. शून्य रनवरच रोहित शर्मा आऊट झाला. यानंतर भारताची पडझड सुरूच होती. पण विराटनं विजय शंकरच्या मदतीनं ही पडझड थांबवली. विजय शंकर ४१ बॉलमध्ये ४६ रन करून आऊट झाला. विराट कोहलीनं मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्ह ऍडम झम्पाच्या हाताला लागून मग स्टम्पला लागल्यामुळे विजय शंकरला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. मागच्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये असलेला धोनी या मॅचमध्ये पहिल्याच बॉलला आऊट झाला. रोहित, धोनी आणि जसप्रीत बुमराह हे तीन भारतीय खेळाडू शून्यवर आऊट झाले.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ऍडम झम्पाला २ विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर नाईल ग्लेन मॅक्सवेल आणि नॅथन लायनला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.