मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवारपासून सुरुवात होईल. या टेस्ट मॅचसाठी भारतानं टीमची घोषणा केली आहे. पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये अपयशी ठरलेले ओपनर मुरली विजय आणि केएल राहुल यांना टीममधून वगळण्यात आलं आहे. या दोघांऐवजी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. पण ओपनर म्हणून मयंक अग्रवालसोबत हनुमा विहारीला पाठवलं जाऊ शकतं.
४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली टेस्ट भारतानं ३१ रननी जिंकली, तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला. तिसऱ्या टेस्टमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम ही सीरिज गमावू शकणार नाही.
पर्थमधल्या दुसऱ्या टेस्टमधल्या पराभवानंतर भारताला समीक्षा करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मिळाला होता. त्यानंतर भारतीय टीम प्रशासनानं खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल आणि मुरली विजयला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीकडे ऑल राऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याला टीममध्ये घेण्याचा पर्याय होता. पण त्यानं हार्दिकऐवजी रोहितला संधी द्यायचा निर्णय घेतला.
पृथ्वी शॉ हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे हनुमा विहारी ओपनर म्हणून कामचलाऊ पर्याय असल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. हनुमा विहारी आंध्र प्रदेशकडून तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं ओपनरची जबाबदारीही पार पाडली आहे. भारतीय टीम प्रशासन हनुमा विहारीच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर समाधानी आहे.
भारतीय टीमनं बॉलिंगमध्येही एक बदल केला आहे. पर्थमध्ये भारत ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या चारही फास्ट बॉलरना घेऊन मैदानात उतरला होता. पण तिसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवऐवजी स्पिनर रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे.
- मेलबर्नमध्ये बुधवार २६ डिसेंबरपासून तिसऱ्या टेस्टला सुरुवात होईल.
- भारतीय वेळेनुसार ही टेस्ट सकाळी ५.०० वाजता सुरु होईल.
- या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स (इंग्लिश), सोनी टेन-३ (हिंदी) वर पाहता येईल.
- मॅचचं ऑनलाईन प्रसारण सोनी लिववर असेल.
ऑस्ट्रेलियानंही त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या पीटर हॅण्ड्सकॉम्बऐवजी ऑलराऊंडर मिचेल मार्शला टीममध्ये निवडण्यात आलं आहे.
विराट कोहली (कर्णधार),मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
टीम पेन (कर्णधार), मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, शॉन मार्श, मिचेल मार्श, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड