Rohit Sharma Future in T20 International Format : आयसीस विश्वचषक स्पर्धा संपली आहे आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia T20 Series) खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विश्वचषकातील अनेख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या (Team India) टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे. या निमित्ताने एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टी20 कारकिर्दीचं काय होणार? चाहत्यांसाठी ही कदाचित धक्कादायक माहिती असू शकते, रोहित शर्मा यापुढे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच याबाबत बीसीसीआयशी चर्चा केली असल्याचं समोर आलं आहे.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्याचं बीसीसीयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडिया टी20 विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर रोहित शर्मा एकही टी20 सामना खेळलेला नाही. यानंतर हार्दिक पांड्याने टी20 संघाची जबाबदारी सांभाळली आहे. म्हणजे गेल्या वर्षभरापासून रोहितशर्मा एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने आपलं संपूर्ण लक्ष एकदिवसीय विश्वचषकावर केंद्रीत केलं होतं. पण आता विश्वचषक संपल्यानंतरही रोहित शर्मा टी20 क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे.
रोहित शर्माने बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्याशीही चर्चा केली असून टी20 क्रिकेटपासून दूर राहाण्याची इच्छा त्याने जाहीर केलाय. हा संपूर्णपणे रोहित शर्माचा वैयक्तिक निर्णय असल्याचंही सू्त्रांनी म्हटलंय.
रोहित शर्माची टी20 क्रिकेट कारकिर्द
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 140 टी20 सामन्यात तब्बल 3853 धावा केल्या असून यात चार शतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 139.24 इतका आहे.
रोहित शर्मा 2007 ते 2022 दरम्यान टी20 विश्वचषकात तब्बल 39 सामने खेळलाय. यात त्याने 9 अर्धशतकांसह 693 धावा केल्या आहेत. टी20 विश्वचषकात रोहितची सर्वोत्तम धावसंख्या 79 इतकी आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट 128 आहे.
टीम इंडियाकडे पर्याय
टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडे रोहित शर्माव्यतिरिक्त चार पर्याय आहेत. यात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आता 37 वर्षांचा आहे. त्यामुळे फिटनेसचा विचार करता तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर जास्त लक्ष देऊ शकतो. डिसेंबर 2023 ते मार्च 2027 पर्यंत टीम इंडिया सात कसोटी सामने खेळणार आहे. यात टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे राहाण्याची शक्यता आहे.