दुसऱ्या टेस्टमध्ये विराट ही टीम घेऊन मैदानात उतरणार?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा थोड्याशा फरकानं पराभव झाला.

Updated: Aug 8, 2018, 05:53 PM IST
दुसऱ्या टेस्टमध्ये विराट ही टीम घेऊन मैदानात उतरणार? title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा थोड्याशा फरकानं पराभव झाला. यानंतर आता दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्य ऐतिहासिक मैदानात सुरुवात होणार आहे. मागच्या दौऱ्यामध्ये लॉर्ड्सच्याच मैदानावर भारताचा विजय झाला होता. त्या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेनं शतक झळकावलं होतं. आता मागच्यावेळसारखीच कामगिरी करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. पण या मॅचमध्ये भारतीय टीम काही बदल करण्याची शक्यता आहे.

शिखर धवनचा फॉर्म बघता त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजाराला या मॅचमध्ये संधी दिली जाऊ शकते. पुजारा टीममध्ये आला तर तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल. तर मागच्या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेला लोकेश राहुल मुरली विजयबरोबर ओपनिंगला येईल.

याचबरोबर भारतीय बॉलिंगमध्येही काही बदल केले जाऊ शकतात. उमेश यादवच्या ऐवजी भारतीय टीम कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजापैकी एका स्पिनरला संधी देऊ शकते. मागच्या मॅचमध्ये गडगडलेली भारताची बॅटिंग बघता विराटनं बॅटिंग भक्कम करण्यावर जोर दिला तर रवींद्र जडेजाचा विचार होऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याला ऑल राऊंडर म्हणून खेळवण्यात आलं होतं. पण ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यामुळे पांड्याला बॉलिंगची फारशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे विराट कोहली आणि रवी शास्त्री उमेश यादवला बाहेर ठेवून हार्दिक पांड्याचा तिसरा बॉलर म्हणून वापर करु शकतील. यामुळे आणखी एका स्पिनरला टीममध्ये जागा मिळू शकते. 

अशी असेल भारतीय टीम?

मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा/कुलदीप यादव, आर. अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव