दुबई : इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारत आणि इंग्लंड प्रबळ दावेदार असतील, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनं व्यक्त केलं आहे. लक्ष्मण यानं वियॉन ग्लोबल समिट(WION Global Summit)मध्ये हे वक्तव्य केलं.
मागच्या बऱ्याच कालावधीपासून भारत आणि इंग्लंडच्या टीमनं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामधल्या आव्हनात्मक परिस्थितीमध्ये भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला, असं लक्ष्मण म्हणाला. वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. मागच्या वर्षभरापासून भारताची कामगिरी बघता विराटची टीम परिपूर्ण आहे. भारताकडे उत्तम फास्ट बॉलर आहेत, जे विकेटही घेऊ शकतात आणि रनची गतीही थांबवू शकतात, अशी प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली.
भारतीय टीम योग्यवेळी फॉर्ममध्ये येत आहे. न्यूझीलंडमधली त्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या विजयानंतर आपण जगज्जेते आहोत, हे भारतानं दाखवून दिलं आहे. मागच्या वर्षी वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेली कामगिरीही विसरता कामा नये, असं लक्ष्मणनं सांगितलं.
वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूनं बॅटिंग करावी याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. पण या क्रमांकावर अंबाती रायुडूलाच खेळवण्यात यावं. धोनी पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल, असा सल्ला लक्ष्मणनं दिला. लक्ष्मणनं भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेसचंही कौतुक केलं. फिटनेसमुळे भारतीय खेळाडूंची फिल्डिंगही सुधारल्याचं लक्ष्मण म्हणाला.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. आगामी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये, अशी भूमिका काही माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांनी मांडली आहे. यावरही लक्ष्मणनं भाष्य केलं. ही वेळ देशासोबत उभं राहण्याची आहे, असं लक्ष्मण म्हणाला.
'भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुलवामा हल्ल्यामुळे ताणले गेले आहेत, यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्ताननं खेळावं का?' असा प्रश्न लक्ष्मणला विचारण्यात आला. तेव्हा 'सध्या क्रिकेट शेवटची गोष्ट आहे, जी सध्या माझ्या डोक्यात आहे.' असं उत्तर लक्ष्मणनं दिलं.
लक्ष्मण यापुढे म्हणाला की, 'देशावर मोठा हल्ला झाला आहे. प्रत्येक भारतीय हा संतापलेला आहे. आमच्या जवानांना वीरमरण आलं आहे. हे जवान आम्ही सुरक्षित राहू हे निश्चित करत होते. त्यामुळे क्रिकेट सध्या माझ्या डोक्यात नाही. सध्या आपण जवानांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला शहिदांच्या कुटुंबांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. एक देश म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सध्या सर्व भारतीय जो विचार करत आहेत, तोच विचार मी करत आहे.'
'भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावपूर्ण संबंधांमुळे आमच्यावरही त्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळताना दबाव असायचा. अशा संबंधांमुळे क्रिकेटपटूंकडून जास्त अपेक्षा असतात. पण तुम्ही फक्त खेळावर लक्ष केंद्रीत केलं, तरच चांगली कामगिरी करू शकता. मैदानातल्या प्रेक्षकांचा किंवा बाहेरच्यांचा तणाव विसरून तुम्हाला खेळावं लागतं,' अशी प्रतिक्रिया लक्ष्मणनं दिली.