देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा नाही, पाकिस्तानविरद्ध खेळू नका- अजहरुद्दीन

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले.

Updated: Feb 21, 2019, 05:09 PM IST
देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा नाही, पाकिस्तानविरद्ध खेळू नका- अजहरुद्दीन title=

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्धचा संताप वाढला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू आणि काही प्रशासकांनीही याला पाठिंबा दिला आहे. भारताचा माजी खेळाडू सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनीही अशीच मागणी केली आहे. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद अजहरुद्दीन यानंही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये असं मत मांडलं आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. तर या स्पर्धेत १६ जूनला भारत-पाकिस्तानचा सामना नियोजित आहे.

पुलवामा हल्ला : गांगुली म्हणतो; 'क्रिकेटच नाही, पाकिस्तानशी खेळाचे संबंध तोडा'

'जर आपण पाकिस्तानशी द्विपक्षीय सीरिज खेळत नसू, तर वर्ल्ड कपमध्येही त्यांच्याविरुद्ध खेळायची गरज नाही. हरभजनच्या मताशी मी सहमत आहे. देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा असू शकत नाही.'

कारगील युद्धावेळी झालेल्या १९९९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. या मॅचबद्दलच्या आठवणीही अजहरनं सांगितल्या. 'त्या मॅचवेळी तणाव होता. युद्ध सुरू असल्यामुळे स्टेडियममधले प्रेक्षकही हाणामारी करतील, असं वाटल्यामुळे आम्ही घाबरलो होतो. आम्ही जिंकलो, तेव्हा जवानांनी जल्लोष केला. जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं असेल, तर सगळीकडे खेळा. जर खेळायचं नसेल, तर कुठेच खेळू नका. आयसीसी आणि बीसीसीआयनं या गोष्टींचा लवकर सोक्षमोक्ष लावावा', असं अजहर म्हणाला.

वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. पाकिस्तानविरुद्ध खेळलं नाही तरी भारताला वर्ल्ड कप जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही, कारण या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे, असं मत सौरव गांगुली आणि हरभजननं व्यक्त केलं. पण सेमी फायनल आणि फायनलमध्ये जर पाकिस्तानविरुद्धची मॅच असेल, तरी भारतानं आपली न खेळण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली. 

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, हरभजनची मागणी