Ind vs Aus : पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 11 रनने विजय

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Updated: Dec 4, 2020, 05:45 PM IST
Ind vs Aus : पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 11 रनने विजय title=

कॅनबेरा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना आज खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना कॅनबेराच्या मैदानावर खेळला गेला. जो भारताने 11 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. केएल राहुलचे अर्धशतक आणि जडेजाच्या शानदार 44 धावांची खेळी या सामन्यात महत्त्वाची ठरली.

ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य होते, परंतु ते 150 धावा करू शकले. या विजयानंतर भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. वनडे सिरीज गमवल्यानंतर टी-20 सिरीज जिंकण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध शानदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. जडेजाच्या जागी सामन्यात आलेल्या चंहलने फिंचची विकेट घेतली. तो 35 धावांवर आऊट झाला. स्मिथलाही 12 धावांवर चहलने आऊट केले. ग्लेन मॅक्सवेलला नटराजनने बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि सुरुवात खराब झाली. शिखर धवन 6 बॉलमध्ये 1 रन काढत धवन आऊट झाला. यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात भागीदारी होईल असं वाटत असताना कोहली 9 बॉलमध्ये 9 रन करत आऊट झाला. तिसरा विकेट पडला तो संजू सॅमसनचा. त्याने 15 बॉलमध्ये 23 रन केले. 

केएल राहुलने भारताकडून अर्धशतक ठोकले. त्याने आपल्या खेळीदरम्यान 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स मारला. भारताला चौथा धक्का मनीष पांडेच्या रुपाने लागला. त्याने 8 बॉलमध्ये फक्त 2 रन केले. केएल राहुलच्या रूपात भारताला पाचवा धक्का बसला. 40 बॉलमध्ये त्याने 51 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 15 बॉलमध्ये 16 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 7 धावांवर बाद झाला. जडेजाने 44 धावांची नाबाद शानदार खेळी केली.

2 डिसेंबर रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी-नटराजनला 4 डिसेंबर रोजी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली. एकदिवसीय सामन्याआधी आयपीएलमध्ये यॉर्कर किंग बनलेल्या टी नटराजनला केवळ त्याच्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळालं. कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.