मुंबई : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी खेळला जाणार होता पण सामन्याच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एकत्रितपणे हा निर्णय घेतला.
4 डिसेंबर रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरू होणार होती पण आता त्यास दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4.30 वाजता खेळला जाणार होता परंतु तो आता पुढे ढकलण्यात आला. सामन्यापूर्वी खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती, यातील यजमान संघाचा एक खेळाडू पॉझिटिव्ह आढळला आणि त्यानंतर सर्व खेळाडूंना हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले.
CONFIRMED: Cricket South Africa and @ECB_cricket confirm the postponement of the first #BetwayODI of the three-match series to Sunday, 06 December 2020. #SAvENG pic.twitter.com/wRXpr7YYA9
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 4, 2020
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला असल्याने सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्याच्या आदल्या दिवशी गुरुवारी टेस्ट घेण्यात आली होती. सामन्यापूर्वी ही एक नियमित चाचणी घेतली जाते. दोन्ही संघांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन सामन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.