IND VS AUS Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील तिसऱ्या सामन्याचा शेवटचा दिवस बुधवारी पार पडला. गाबा येथे खेळवला गेलेला सामना हा ड्रॉ झाला ज्यामुळे सध्या सीरिज ही 1-1 अशा बरोबरीत आहे. गाबा टेस्ट दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांवर दुःखाचा डोंगर कोसळला. टेस्ट सामन्यापूर्वी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच निधन झाल्याची बातमी त्याला कळाली, मात्र तरीही गोलंदाजाने देशाला प्रथम प्राधान्य दिलं आणि तो दुःख विसरून खेळला. एवढंच नाही गोलंदाजी सह फलंदाजीतही उत्तम खेळाचे प्रदर्शन करून त्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.
एक खरा खेळाडू तोच असतो जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्यांना प्राथमिकता देतो. मैदानावर जिंकायची भावना आणि संघासाठी सर्वकाही झोकून देऊन काम करणे हीच खरी खिलाडूवृत्तीची व्याख्या आहे. भारताचा युवा खेळाडू आकाश दीप (Akash Deep) याने देखील कठीण प्रसंगी टीम इंडियासाठी मैदानात चांगली कामगिरी करून त्याच कर्तव्य निभावलं.
न्यूज 18 च्या वृत्तानुसार टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा गोलंदाज आणि मूळचा बिहारचा असलेला आकाश दीप याचे मोठे काका भैरोंदयाल सिंह यांचे 11 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. भैरोंदयाल सिंह यांसह वय 82 वर्षाचे होते. कुटुंबातील अतिशय जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असताना आकाश दीपने मात्र देशाप्रती कर्तव्य निभावण्यास प्राधान्य दिले. दरम्यान आकाश दीपने गाबा टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची एक विकेट घेतली. यात त्याने विकेटकिपर फलंदाज ॲलेक्स कॅरीला बाद केले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आकाशने ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेतल्या. यात मॅकस्विनी आणि मिचेल मार्श यांचा समावेश होता. एवढंच नाही तर आकाश दीपने टीम इंडियासमोरील फॉलोऑन टाळताना फलंदाजीत सुद्धा मोठे योगदान दिले. आकाशने 44 बॉलचा सामना करून 31 धावा केल्या, यात 2 चौकार आणि एक सिक्सचा सहभाग होता.
हेही वाचा : आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...'
28 वर्षांच्या आकाश दीपने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये तो बंगालकडून तर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. आकाश दीप केवळ 16 वर्षांचा असताना त्याचे वडिल रामजी सिंह यांचे निधन झाले. आकाश दीप आणि त्याचा सहकारी वैभव कुमार शहरातील बेडा परिसरात क्रिकेट प्रशिक्षण केंद्र चालवतात. खूप लहान वयात कुटुंबाची जबाबदारी आकाश दीपच्या अंगावर पडली होती. आकाश दीपने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 6 सामने खेळले असून 13 विकेट्स घेतले आहेत.