विराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात

ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. 

Updated: Oct 19, 2023, 09:44 PM IST
विराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात title=

ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) विजयाची घौडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने विश्वचकात सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा (India beat Bangladesh) 7 विकेटने सहज पराभव केला. पहिली फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने टीम इंडियासमोर विजयासाठी 256 धावांचं आव्हान केलं होतं. विजयाचं हे आव्हान भारताने 3  विकेटच्या मोबदल्यात पार केलं. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटने भारताच्या विजयाबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधलं 48 वं शतकंही नोंदवलं.

टीम इंडियाची दमदार कामगिरी
विजयासाठी 256 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने मैदानात उतरताच बांगलादेशच्या फलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली. रोहित शर्मा-शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 88 धावांची पार्टनरशिप केली. पण रोहित शर्माची हाफसेंच्युरी थोडक्यात हुकली. रोहित शर्मा 48 धावा काढून बाद झाला. तर शुभमन गिल 53 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये परला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने फटेकबाजी करत धावसंख्या वाढवली. पण फटकेबाजीच्या नादात तो 19 धावांवर बाद झाला.

पण यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने आणखी पडझड होऊ न देता भारताला शानदार विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 97 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधली ही त्याची अठ्ठेचाळीसवी सेंच्युरी ठरलीय. आता सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. 

बांगलादेशची दमदार सुरुवात
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन या सामन्यात बाहेर होता. त्याचा जागी नजमुल हसन शांतोने कर्णधार पद सांभाळलं. बांगलादेशने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीच्या जोडीने अगदी योग्य ठरला.  लिट्टन दास आणि तांझिद हसन या सलामीच्या जोडीने सामन्याच्या पहिल्या षटकापासून आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. बांगलादेशची सुरुवात पाहाता ते 300 धावांचा टप्पा गाठणार असंच वाटत होतं. 

कुलदीपने दिला पहिला धक्का
लिट्टन दास आणि तांझिद हसन जोडी फॉर्मात असतानाच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चायनामन गोलंदाजी कुलदीप यादवच्या हातात चेंडू सोपवला. कुलदीपने कर्णधाराला निराश केलं नाही. कुलदीपने तांझिद हसनला बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. ही जोडी फुटली आणि बांगलादेशच्या फलंदाजीला ओहोटी लागली. ठराविक अंतराने बांगलादेशचे फलंदाज बाद होत गेले. लिट्टन दास 51 आणि मोहम्मदल्लाने 46 धावा करत संघाला अडीचशे धावांचा टप्पा गाठून दिला. भारतातर्फे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.