Rohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर

Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 14, 2023, 08:13 PM IST
Rohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर title=

World Cup 2023 India vs Pakitan : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) पुन्हा एकदा पाकिस्तानला धुळ चारली आहे. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तनाचा पराभव करण्याची परंपरा रोहितसेनेनंही कायम ठेवली आहे. विश्वचषकाच्या इतिहासत तब्बल आठव्यांदा भारताने पाकिस्तानवर (India Beat Pakistan) मात केली आहे.  भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पहिली फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांवर बाद झाला. विजयाचं हे माफक आव्हान टीम इंडियाने 7 विकेट राखून पार केलं. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन अर्थात रोहित शर्मा (Rohit Sharma). ज्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना शरणागती घ्यायला भाग पाडलं. त्याच मैदानावर रोहित शर्माने जगात भारी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदांजांची पिसं काढली. 

रोहित शर्माने रचला इतिहास
रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान गोंदाजांवर आक्रमण केलं. रोहित शर्माने 86 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने 6 षटकार आणि 6 चौकार ठोकले. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम नावावर केला आहे. रोहित शर्माने षटकारांचं तिहेरी शतक पूर्ण केलं आहे. म्हणजेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने 300 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 301 षटकार, टी20 क्रिकेटमध्ये 182 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 77 षटकार जमा झाले आहेत. 

एकदिवसीय  क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार
1. शाहिद अफरीदी (पाकिस्तान) - 351 (369 इनिंग)

2. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - 331 (294 इनिंग)

3. रोहित शर्मा (भारत) - 300* (246 इनिंग)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय, कसोटी आणि टी20) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला. त्याने वेस्टइंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकलं

1. रोहित शर्मा (भारत) - 560 षटकार

2. ख्रिस गेल (वेस्टइंडीज) - 553 षटकार

3. शाहिद अफरीदी (पाकिस्तान) - 476 षटकार

4. ब्रँडन मॅक्कुलम (न्यूजीलंड) - 398 षटकार

5. मार्टिन गप्टिल (न्यूजीलंड) - 383 षटकार

6. महेंद्र सिंह धोनी (भारत) - 359 षटकार

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत सात शतकं केली आहे.  विश्वचषक स्पर्धेत सचिनने सहा शतकं केली होती. तर रिकी पॉण्टिंग -5, कुमार संगकारा -5 आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 4 शतकं होती.