World Cup : गतविजेत्या इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला 'गेम ओव्हर', सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

ICC World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरुच आहे. श्रीलंकेने एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा आठ विकेटने पराभव केला. पाच सामन्यातला इंग्लंडचा हा चौथा पराभव ठरला आहे. यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडचा संघ जवळपास बाहेर फेकला गेलाय.

राजीव कासले | Updated: Oct 26, 2023, 08:07 PM IST
World Cup : गतविजेत्या इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला 'गेम ओव्हर', सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर title=

ICC World Cup 2023 Sri Lanka vs Enland : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडचा (England) गेम जवळपास ओव्हर झाला आहे. पाचपैकी इंग्लंडला तब्बल चार सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. पॉईंटटेबलमध्ये (WC PointTable) इंग्लंडचा संघ नवव्या स्थानावर घसरला असून सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंड जवळपास बाहेर फेकला गेलाय. आयसीसी विश्वचषकाच्या पंचवीसाव्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सामना झाला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. 

इंग्लंडचं आव्हान संपुष्टात
2019 च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. 2023 विश्वचषक स्पर्धेची सुरुवातही गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्यानेच झाली. या सामन्यात पराभवाचा बदला घेत न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा तब्बल 137 धावांनी पराभव करत दमदार कमबॅक केला. इंग्लंडचा संघ पुन्हा फॉर्मात आलाय असं वाटत असतानाच त्यांच्या खेळी ग्रहण लागलं आणि पुढचे सलग तीन सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तााने इंग्लंडवर सहज मात केली. तर चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा तब्बल 229 धावांनी धुव्वा उडवला. हे कमी की काय श्रीलंकेनेही इंग्लंडवर आठ विकेटने मात केलीय.

पॉईंटटेबलमध्ये घसरण
पाचपैकी चार सामन्यात पराभव आणि तेही दणदणीत. साहजिकच पॉईंटटेबलमध्येही इंग्लंडची दणदणीत घसरण झाली. इंग्लंडची यंदा विश्वचषकातील कामगिरी पाहून हाच का गतविजेता संघ असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. पॉईंटटेबलमध्ये इंग्लंडचा संघ नवव्या स्थानावर आहे. धक्कादायक म्हणजे इंग्लंडचा नेट रनरेट -1.634 इतका कमी आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारखे संघही पॉईंटटेबलमध्ये इंग्लंडच्या वर आहेत. इंग्लंडचे स्पर्धेत आणखी चार सामने बाकी आहेत. पण या चारही सामन्यात इंग्लंडला विजय मिळवा लागेल आणि ते ही मोठ्या फरकाने. इंग्लंडची सध्याची कामगिरी पाहाता हे जवळपास अशक्य आहे. त्यातच इंग्लंडचा पुढचा सामना जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताबरोबर आहे. त्यामुळे इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

श्रीलंकेचा इंग्लंडवर एकतर्फी विजय
इंग्लंडने पहिली फलंदाजी करतना श्रीलंकेसमोर अवघ्या 157 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. विजयाचं हे आव्हान श्रीलंकेने दोन विकेटच्या मोबदल्यात पार केलं. इंग्लंडचा एकही फलंदाजी मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेत विश्वचषकात खेळणारा बेन स्टोक्सही इंग्लंडला वाचवू शकला नाही. श्रीलंकेचा विश्वचषकातला हा दुसरा विजय ठरला आहे.