T20 World Cup 2021 | सेमी फायनल सामन्याआधी 'या' टीमला मोठा धक्का, 4 शतकं ठोकणारा फलंदाज बाहेर

 टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत मोक्याच्या वेळेस सेमी फायनल सामन्याआधी स्टार फलंदाजाला दुखापत झाल्याने या टीमला  मोठा धक्का बसला आहे.

Updated: Nov 8, 2021, 07:21 PM IST
T20 World Cup 2021 | सेमी फायनल सामन्याआधी 'या' टीमला मोठा धक्का, 4 शतकं ठोकणारा फलंदाज बाहेर title=

यूएई : इयॉन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकू पाहणाऱ्या इंग्लंड क्रिकेट टीमला (England Cricket Team) सेमी फायनल सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडला सेमी फायनलपर्यंत (Semi Final) पोहचवण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या दिग्गज सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. इंग्लडने क्रिकेट टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जेसन रॉयला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. (icc t 20 world cup 2021 england opener jason roy ruled out due to calf injurey)

जेसन रॉयला आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात धावा घेताना दुखापत झाली होती. जेसनने या स्पर्धेत इंग्लंडला अपेक्षित आक्रमक सुरुवात मिळवून दिली. मात्र आता दुखापतीमुळे जेसन बाहेर पडल्याने स्पर्धेच्या निर्णायक क्षणी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. रॉय स्पर्धेबाहेर झाल्याने राखीव खेळाडू म्हणून सलामीवीर जेम्स विंसला (James Vince) संधी दिली आहे. इंग्लंड 10 नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनल सामन्यात भिडणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील कामगिरी

जेसनने या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्याने 1 अर्धशतकाच्या मदतीने 120 धावा केल्या होत्या.

2 वर्षानंतर मैदानात उतरणार

दरम्यान जेसनच्या जागी संधी मिळालेला जेम्स विंस तब्बल 2 वर्षानंतर मैदानात उतरणार आहे. जेम्सने अखेरचा टी 20 सामना हा 10 नोव्हेंबर 2019 ला न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. जेम्स हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंडकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. जेम्सने 12 टी 20 सामन्यात 123 च्या स्ट्राईक रेटने 340 धावा केल्या आहेत. तर एकूण टी 20 करियरमध्ये जेम्सने 259 डावात 2 शतक आणि 44 अर्धशतकांच्या जोरावर 7 हजार 146 रन्स केल्या आहेत.