Cricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?

Cricket in Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस आयसीसीकडून करण्यात आली आहे.  

Updated: Jan 23, 2023, 12:41 PM IST
Cricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?  title=

Cricket in Olympics ICC : 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसीचे (ICC) जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आयसीसी स्वत: यासाठी प्रयत्न करत आहे. सोमवारी मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) चे अध्यक्ष माईक गेटिंग (Mike Getting) यांनी ही माहिती दिली. दरम्यान क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (Cricket in Olympics) समावेश करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या बैठकीत होणार आहे.

दरम्यान 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आयसीसीने पुरूष आणि महिलांच्या 6 संघांमधील या स्पर्धेचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. t20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टॉप 6 संघांना त्यांच्या क्रमवारीच्या आधारे स्थान दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरूष आणि महिला दोन्ही संघांच्या स्पर्धेसाठी ही शिफारस केली आहे.  तसेच ऑलिम्पिकमधील 6 संघांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या स्वरूपाविषयी बोलायचे झाल्यास संघांना 3-3 अशा दोन गटात ठेवता येईल. यातून दोन्ही गटातील अव्वल 2 संघांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. तर बाद फेरीत विजयी होणारे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचतील. विजेत्या संघाला सुवर्णपदक, तर उपविजेत्या संघाला रौप्य पदक दिले जाईल. त्याचवेळी उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करणाऱ्या दोन्ही संघांमध्ये कांस्यपदकासाठी सामना रंगणार आहे. 

 

वाचा: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा 

 

याआधीही ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता

सुरूवातीला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होता. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. त्यावेळी फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटनचे दोनच संघ सहभागी झाले होते. तेव्हा ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक जिंकले तर फ्रान्सला रौप्यपदक मिळाले होते.