ICC Ranking update: भारतात सुरु असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC World Cup 2023) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जबरदस्त फॉर्मात आहे. तीन सामन्यात रोहितने 217 धावा केल्या आहेत. यात अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांच्या खेळीचा समावेश आहे. याच कामगिरीच्या जोरावर रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) मोठी झेप घेतली आहे. 10 ऑक्टोबरला जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा 11 व्या स्थानावर होता. पण आता ताज्या क्रमवारीत रोहित शर्माने थेट पाच स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत रोहित शर्मा थेट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. टीम इंडियाचा सलामीचा युवा फलंदाज शुभमन गिल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नवव्या स्थानावर आहे. याशिवाय आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
विश्वचषकात रोहित शर्मा फॉर्मात
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा दमदार खेळी करतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा पुढच्या दोन सामन्यात मात्र चमकला. अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची दमदार खेळी केली. तर पाकिस्तानविरुद्ध 86 धावा फटकावल्या. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जास्त शतकांचा रेकॉर्डही रोहित शर्माच्या नावावर आहे.
बाबर आझम टॉपवर
आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबर आझमच्या नावावर 836 पॉईंट जमा आहेत. या विश्वचषकात बाबर आझमला अद्याप सुर सापडलेला नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात बाबरने पन्नास धावा केल्या होत्या. क्रमवारीत बाबर आझमनंतर 818 पॉईंटसह शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डिकॉक तिसऱ्या, रासी वेन डेर डूसेने चौथ्या, तर हॅरी टेक्टर पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 719 पॉईंटसह सहाव्या क्रमांवर आहे. तर नवव्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीच्या खात्यात 711 पॉईंट आहेत.
बाबर आझमची बादशाहत धोक्यात
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबर आझम असला तरी बादहाशत धोक्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शुभमन गिल आणि बाबरमध्ये केवळ 18 पॉईंटचं अंतर आहे. याशिवाय रोहित शर्माही जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकातील त्याचा सध्याचा फलंदाजीचा फॉर्म बघता येणाऱ्या काही सामन्यात क्रमवारीत तो टॉपवर जाण्याची शक्यता नाकारता येतन नाही.