मुंबई : २०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच या मॅच टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत. क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. आयसीसीनं या मॅचचं वेळापत्रक ट्विटरवरून शेअर केलं आहे. ४ मार्च ते २५ मार्चपर्यंत हरारे स्पोर्ट्स क्लब, ओल्ड हरारियन्स, क्विन्स स्पोर्ट्स क्लब बुलावायो आणि बुलावायो एथलिटिक्स क्लब या ठिकाणी या मॅच खेळवण्यात येणार आहेत.
या क्वालिफायरच्या १० मॅचचं ५ खंडांमधल्या २०० देशांमध्ये प्रसारण करण्यात येणार आहे. यातल्या ४ मॅच लाईव्ह असतील. या मॅच ऑनलाईनही पाहता येणार आहेत.
Check out which matches at #CWCQ you will be able to watch live, with the tournament set to be broadcast on TV for the first time ever! https://t.co/5YblHdfgUp pic.twitter.com/1aMMaZ13aA
— ICC (@ICC) March 1, 2018
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले. पण याच टीमवर २०१९ सालचा वर्ल्ड कप न खेळण्याची नामुष्की ओढावू शकते. वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आता वेस्ट इंडिजला क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत. ४ मार्च ते २५ मार्चदरम्यान झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर मॅच खेळवण्यात येणार आहेत. या क्वालिफायर मॅचपूर्वी झालेल्या सराव सामन्यामध्ये अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.
३० सप्टेंबर २०१७च्या आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये टॉप ८ टीममध्ये नसल्यामुळे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांना क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये भाग घेणाऱ्या टीमचा पाच-पाचचा ग्रुप बनवण्यात आला आहे. वेस्ट इंडिज, आयर्लंड, नेदरलँड, पपुआ न्यूगिनी आणि युएई या टीम ए ग्रुपमध्ये आणि अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग आणि नेपाळ या टीम ग्रुप बीमध्ये आहेत.
आयसीसी क्रिकेट क्वालिफायरच्या ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल. यानंतर ग्रुप स्टेजमधल्या टॉप ३ टीम सुपर सिक्समध्ये जातील. ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध न खेळलेल्या टीममध्ये सुपर सिक्सचे सामने होतील आणि फायनलमध्ये गेलेल्या टीमना २०१९चा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळेल. २०१९ चा वर्ल्ड कप १० टीममध्ये खेळवण्यात येणार आहे.