World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध सामन्यातील पराभवासाठी धोनीला दोष देण्याआधी 'हे' नक्की वाचा

या एका सामन्यातील खेळीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली 

Updated: Jul 4, 2019, 02:53 PM IST
World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध सामन्यातील पराभवासाठी धोनीला दोष देण्याआधी 'हे' नक्की वाचा   title=

बर्मिंघम : इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची आतापर्यंत समाधानकारक कामगिरी पाहायला मिळाली आहे. पण, असं असलं तरीही संगातील काही खेळाडूंप्रती मात्र क्रीडाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच संघाचा माजी कर्णधार आणि यष्ठीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्यावरही टीका केली जात आहे. 

यंदाच्या विश्वचषकात धोनी त्याच्या खेळीने क्रीडारसिकांवर छाप पाडण्यात काही अंशी अपयशी ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या इंग्लंड विरोधातील सामन्यातही संघाला विजयासाठी जलद धावांची आवश्यकता होती. पण त्याच वेळी धोनीच्या खेळाचा वेग मंदावला होता. परिणामी भारतीय संघाला यजमान संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. 

इंग्लंडविरोधात भारताच्या संघाचा पराभव झाल्यानंतर समालोचकांपासून नेटकरीही धोनीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. पण, या साऱ्यामध्ये त्याला झालेल्या दुखापतीकडे मात्र कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं. सोशल मीडियावर सध्याच्या घडीला त्याच सामन्यातील धोनीचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो रक्त थुंकताना दिसत आहे. या सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दोनदा दुखापत झाली होती. पहिल्यांदा यष्टीरक्षण करताना आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याने अंगठ्यातील रक्त खेचून ते तो थुंकत होता. त्याचवेळी हा फोटो टीपण्यात आला होता. पण, ही बाब मात्र दुर्लक्षित राहिली. 

धोनीला झालेली दुखापत आणि तरीही खेळाप्रती असणारी त्याची निष्ठा पाहता पुन्हा एकदा त्याने या खेळाप्रतीची आत्मियता दाखवून दिली, असंच म्हणावं लागेल. दुखापतीमुळे फलंदाजीमध्ये काही अडचणी येऊच शकतात हा मुद्दा आता अनेकांच्या लक्षात येत असून, धोनीवर केली जाणारी टीका मात्र थांबली आहे.