दुबई : २०१९ हे वर्ष रोहित शर्मासाठी खास ठरलं. या एका वर्षात रोहितने खोऱ्याने रन काढल्या. याचाच इनाम रोहित शर्माला आयसीसीने दिला आहे. रोहितची २०१९ सालचा 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने २०१९ मध्ये एकूण ७ शतकं केली, यातली ५ शतकं ही वर्ल्ड कपमधली आहे.
इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने ९ मॅचमध्ये ६४८ रन केले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या या सर्वाधिक रन होत्या. तसंच एका वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं करण्याचा विक्रमही रोहितने वर्ल्ड कपमध्ये केला. याआधी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता संगकाराने २०१५ वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती.
२०१९ या वर्षात रोहितने २८ वनडे मॅचमध्ये ५७.३० च्या सरासरीने १,४९० रन केले. तर विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विराटने २०१९ साली २६ मॅचमध्ये ५९.८६ च्या सरासरीने १,३७७ रन केले, यात ५ शतकांचा समावेश आहे.
मागची लागोपाठ २ वर्ष विराटला आयसीसीचा 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला होता, पण यंदा रोहितने विराटला ही हॅट्रिक साधण्यापासून रोखलं. विराटला २०१२ सालीही हा पुरस्कार मिळाला होता. तर एमएस धोनीला २००८ साली या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३ द्विशतकं आहेत. रोहितने २२२ वनडे मॅचमध्ये ४८.९२च्या सरासरीने ८,९५४ रन केले आहेत, यामध्ये २८ शतकं आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२०१९ सालच्या आयसीसी पुरस्कारांवर भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं होतं. यानंतर वर्ल्ड कपसाठी या दोघांची ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झाली. बॉल छेडछाडप्रकरणावरुन वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथला चिडवलं. यावेळी कोहलीने स्मिथला चिडवू नका, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, असं सांगितलं. या वागणुकीबद्दल विराटचा सन्मान करण्यात आला.
विराट कोहलीला आयसीसीच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधारही बनवण्यात आलं आहे. याचसोबत मयंक अग्रवालची टेस्ट टीममध्ये आणि रोहित शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमीची वनडे टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
क्रिकेटर ऑफ द इयर- बेन स्टोक्स
टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर- पॅट कमिन्स
वनडे क्रिकेटर ऑफ द इयर- रोहित शर्मा
स्पिरीट ऑफ क्रिकेट- विराट कोहली
उदयोन्मुख क्रिकेटपटू- मार्नस लॅबुशेन
टी-२० स्पेल ऑफ द इयर- दीपक चहर (बांगलादेशविरुद्ध ७ रन देऊन ६ विकेट)
अंपायर ऑफ द इयर- रिचर्ड एलिंगवर्थ
रोहित शर्मा, शाय होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आजम, केन विलियमसन, बेन स्टोक्स, जॉस बटलर (विकेट कीपर), मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
मयंक अग्रवाल, टॉम लेथम, मार्नस लॅबुशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलिंग (विकेट कीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, निल वॅगनर, नॅथन लायन