INDvsAUS: दुसऱ्या वनडेआधी भारताला धक्का, पंत दुखापतीमुळे बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. 

Updated: Jan 16, 2020, 07:39 AM IST
INDvsAUS: दुसऱ्या वनडेआधी भारताला धक्का, पंत दुखापतीमुळे बाहेर title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. भारताने ठेवलेल्या २५६ रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता केला. आता सीरिज वाचवण्यासाठी भारताला शुक्रवारी राजकोटमध्ये होणारी दुसरी वनडे मॅच जिंकावीच लागणार आहे. पण या मॅचआधीच भारताला धक्का लागला आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंत दुसरी वनडे मॅच खेळू शकणार नाही. पंतऐवजी भारतीय टीमने दुसऱ्या कोणत्याच खेळाडूची निवड केलेली नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलियातली पहिली मॅच मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवली गेली होती. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पंतला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यामुळे केएल राहुलने पंतऐवजी विकेट कीपिंग केली होती.

ऋषभ पंतने पहिल्या वनडेत ३३ बॉलमध्ये २८ रन केले. पॅट कमिन्सने टाकलेल्या बाऊन्सरा हूक करण्याचा प्रयत्न पंतने केला. हा शॉट मारत असताना बॉल पंतच्या बॅटला आणि मग हेल्मेटला लागला. पॉईंटवर उभ्या असलेल्या एश्टन टर्नरने पंतचा सोपा कॅच पकडला. हेल्मेटला बॉल लागल्यामुळे पंतच्या डोक्याला दुखापत झाली. पंतवर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.