टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, बुमराहची मोठी झेप

आयसीसीनं २०१८ या वर्षातली शेवटची टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे.

Updated: Dec 31, 2018, 04:35 PM IST
टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, बुमराहची मोठी झेप title=

दुबई : आयसीसीनं २०१८ या वर्षातली शेवटची टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकवर आणि बॅट्समनच्या यादीमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ९ विकेट घेणारा जसप्रीत बुमराहनं क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. बुमराहनं १२ स्थानांची उडी घेऊन तो १६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये चमकलेला पॅट कमिन्स बॉलरच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं १३७ रननी जिंकली. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा तब्बल ४२३ रननी विजय झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टनं ९ विकेट घेतल्या. यामुळे बोल्ट १४व्या क्रमांकावरून ७व्या क्रमांकावर आला आहे.

लुंगी एनगीडी आणि वर्नन फिलंडर दुखापतग्रस्त झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये डुआने ओलीव्हरला संधी देण्यात आली. ओल्हीव्हरनंही या संधीचं सोनं केलं. फास्ट बॉलर असलेल्या ओलीव्हरनं दोन्ही इनिंगमध्ये ५-५ विकेट घेतल्या. मॅचमध्ये ११ विकेट घेतल्यामुळे ओलीव्हर १७ स्थान वरती आला. ओलीव्हर आता ३६व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा केन विलियमसन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत १० स्थान वरती ३८व्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा ११ स्थान वर ४४व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑलराऊंडरच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. 

न्यूझीलंडची सर्वोत्तम कामगिरी

टेस्ट क्रमवारीमध्ये भारत ११६ अंकांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तरी २०१८ या वर्षामध्ये न्यूझीलंडनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे. क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा तब्बल ४२३ रननं विजय झाला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडच्या खात्यात १०७ अंक झाले आहेत. भारत आणि इंग्लंडनंतर न्यूझीलंडची टीम तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका (१०६ अंक) चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडनं पुढच्या २ टेस्ट जिंकल्या तर त्यांच्या खात्यात १०९ अंक होतील आणि ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमलाही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. यासाठी आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध ३-०नं विजय मिळवावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला तर त्यांच्या खात्यात १०९ अंक होतील. या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका १-०नं आघाडीवर आहे.