T 20 World Cup 2022 | पुन्हा मौका मौका | टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार

आयसीसीने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपचं (ICC T 20 World Cup 2022) वेळापत्रक जाहीर केलं आहे.  

Updated: Jan 21, 2022, 04:53 PM IST
 T 20 World Cup 2022 | पुन्हा मौका मौका | टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार title=

मुंबई : आयसीसीने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीच्या या स्पर्धेतील पात्रता फेरीती सामन्यांची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर मुख्य स्पर्धा 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने कट्टर प्रतिस्पर्धी असलेले टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानेच होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. (icc announced t 20 world cup 2022 schedule held in australia india and pakistan face to face on 23 october see full time table)

पुन्हा मौका मौका

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानने टीम इंडियाचा 2021 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव केला होता. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता. 

आता रोहित शर्माला आपल्या कॅप्टन्सीत या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया रोहितच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानला पराभूत करुन मागील स्पर्धेतील पराभवाचा बदला घ्यावा, अशीच भारतीयाची इच्छा आहे.  

एकूण 2 टप्प्यांमध्ये स्पर्धेचं आयोजन

आयसीसीच्या या स्पर्धेचं एकूण 2 टप्प्यात आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने हे 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.  या दरम्यान वेस्टइंडिज आणि श्रीलंका टीम क्वालिफायर टीमसोबत दोन हात करतील. यानंतर 22 ऑक्टोबरपासून साखळी फेरीतील म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना (Super 12) सुरुवात होणार.  

Super 12 मधील पहिला सामना कोणाचा? 

सुपर 12 फेरीतील पहिला सामना 22 ऑक्टोबरला खेळवण्यात येणाल आहे. हा सामना वर्ल्ड कप विजेता आणि उपविजेता संघ अर्थात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे.  

कोणती टीम कोणत्या ग्रृपमध्ये?  

एकूण 12 संघांना 2 ग्रृपमध्ये विभागण्यात आलं आहे. यातील ग्रृप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. तर ग्रृप 2मध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे. 

टीम इंडियाचे सामने कधी आणि कुठे?   

टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील ग्रृप ए मधील उपविजेता संघाविरुद्ध टीम इंडिया खेळेल.  हा सामना 27 ऑक्टोबरला सिडनीत पार पडेल.  

तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसह टीम इंडिया दोन हात करेल. हा सामना 30 ऑक्टोबरला पर्थमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध पार पडेल. ही मॅच एडिलेड इथं होणार आहे. टीम इंडिया सुपर 12 मधील अखेरचा सामना हा 6 नोव्हेंबरला ग्रृप बीमधील उपविजेत्या संघासोबत खेळणार आहे.