Hockey World Cup 2018 : नेदरलँड्सचा स्वप्नभंग, बेल्जियमच्या संघाकडे विश्वविजेतेपद

पेनल्टी शूटाआऊटचा थरार आणि रोमहर्षक विजय... 

Updated: Dec 17, 2018, 08:27 AM IST
Hockey World Cup 2018 : नेदरलँड्सचा स्वप्नभंग, बेल्जियमच्या संघाकडे विश्वविजेतेपद  title=

मुंबई : भारताचा राष्ट्रीय खेळ समजल्या जाणाऱ्या हॉकी या खेळात रविवारचा दिवस बेल्जियमच्या संघासाठी सोनेरी पहाट आणणारा ठरला. हॉकी विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामन्यात रविवारी बेल्जियमच्या संघाने नेदरलँड्सच्या संघाला पराभूत करत या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला होता. 

ऑलिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक कमावणाऱ्या बेल्जियमच्या संघाने नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव केला. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक खेळांमधील पदकानंतर बेल्जियमच्या संघाची ही दुसरी उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. 

हॉकी विश्वचषकाच्या स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाला मागे टाकत बेल्जियमने जणू एक इतिहासच रचला आहे. अतिशय चुरशीच्या या सामन्यात मध्यंतरानंतरही कोणत्याच संघाला हॉकीचा चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवता आला नव्हता. ज्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत जाणार असल्याची कल्पना अनेकांनाच आली होती. मात्र सडन डेथमध्ये हट्र्झबर्गर अपयशी ठरला व बेल्जियमने एकच जल्लोष केला.

यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेल्जियम आणि नेदरलँड अशा दोन्ही संघामध्ये उत्तम खेळ पाहायला मिळाला. पासिंग आणि डिफेन्समध्ये या दोन्ही संघांनी उत्तम खेळांचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. उत्तरार्धात नेदरलँड्सच्या संघाचं पारडं जड दिसलं हेसुद्धा तितकच खरं.  

चौथ्या वेळी विश्वचषक जिंकण्याचं नेदरलँडचं स्वप्न अपूर्णच.. 

१९७३, ९० आणि ९८ मध्ये नेदरलँड्सच्या संघाने हॉकी विश्वचशकावर आपलं नाव कोरलं होतं. २०१४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात या संघाला ऑस्ट्रेलियाकडून ६-१ अशा पराभवाचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळे चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याच्या स्वप्नाने पुन्हा एकदा नेदरलँड्सला हुलकावणी दिली आहे. असं म्हणायला हरकत नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x