पाकिस्तानच्या पराभवानंतर बलूच लोकांकडून हसन अली ट्रोल, मीम्स होताय व्हायरल

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानातील प्रांत असलेल्या बलुचिस्तानमधील लोकांकडून पाकिस्तानी टीम ट्रोल होतेय.

Updated: Nov 12, 2021, 03:35 PM IST
पाकिस्तानच्या पराभवानंतर बलूच लोकांकडून हसन अली ट्रोल, मीम्स होताय व्हायरल title=

मुंबई : ऑस्ट्रेलियन संघ 2021 च्या T20 विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचला आहे. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कांगारू संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला होता.

हसन अलीने वेडचा कॅच सोडल्यानंतर पाकिस्तानातूनच त्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे बलूच लोकांनी देखील हसन अलीला ट्रोल केलं आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. यावेळी बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या समर्थकांनी संगीताच्या तालावर जल्लोष केला. बलुच नॅशनल मूव्हमेंट यूके झोनचे अध्यक्ष हकीम बलोच यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोकांच्या आनंदाला थारा नाही. पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन पत्रकार तारिक फतेह यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

विशेष म्हणजे, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक प्रांत आहे, ज्याची राजधानी क्वेटा आहे. बलुचिस्तानचे लोक अनेक वर्षांपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पण 2003 पासून स्वातंत्र्याच्या मागणीने जोर पकडला. बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. तसेच पाकिस्तानी लष्कराची बलुच लोकांप्रती असलेली क्रूर वृत्ती सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत अनेक बलुच नेते पाकिस्तानबाहेर राहून इतर देशांमध्ये वास्तव्यास आहेत.

वेड-स्टोइनिसची धडाकेबाज खेळी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. दुसरीकडे, फखर जमानने नाबाद 55 आणि बाबर आझमने 39 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 5 बाद 177 धावा करून सामना जिंकला. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी मॅथ्यू वेडने 41 आणि मार्कस स्टॉइनिसने 40 धावांची नाबाद खेळी खेळली. पाकिस्तानकडून फिरकी गोलंदाज शादाब खानने शानदार गोलंदाजी करताना चार बळी घेतले.