'या अभिनेत्रीनं करावा माझा बायोपिक'

क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर सध्या बरेच बायोपिक येत आहेत. सचिन, अजहर धोनी यांचे बायोपिक आधीच रिलीज झाले आहेत.

Updated: Aug 10, 2017, 08:10 PM IST
'या अभिनेत्रीनं करावा माझा बायोपिक' title=

मुंबई : क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर सध्या बरेच बायोपिक येत आहेत. सचिन, अजहर धोनी यांचे बायोपिक आधीच रिलीज झाले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत मजल मारलेल्या भारताच्या महिला टीमचे सदस्यही स्वत:च्या बायोपिकबाबत उत्सुक आहेत.

भारताची क्रिकेटपटू हरमनप्रीतनंही तिच्या बायोपिकबद्दल भाष्यं केलं आहे. माझा बायोपिक आला तर दीपिका पादुकोणनं माझी भूमिका करावी, असं वक्तव्य हरमनप्रीतनं केलं आहे. दीपिकाच माझ्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असं हरमनप्रीत म्हणाली आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरमनप्रीतनं हे वक्तव्य केलं आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर लोकं मला ओळखायला लागले. कुठेही गेल्यावर लोकं माझ्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात, असं हरमनप्रीत म्हणाली आहे. तसंच काही जणांनी माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छाही वर्तवली आहे, अशी प्रतिक्रिया हरमनप्रीतनं दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीतनं १७१ रन्सची ऐतिहासिक खेळी केली होती. हरमनप्रीतच्या या खेळीमुळे भारतानं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मजल मारली होती. पण इंग्लंडविरुद्धच्या रोमहर्षक फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता.