मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. दुखापतीतून सावरत असलेल्या हार्दिक पांड्याची टी-२० सीरिजसाठी निवड झालेली नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये हार्दिक पांड्या राहुल द्रविडकडून ट्रेनिंग घेणार आहे. राहुल द्रविड हा एनसीएचा प्रमुख आहे.
मंगळवारपासून हार्दिक पांड्याच्या रिहॅबिलिटेशनला सुरुवात होणार आहे. १५ ते २० दिवस हार्दिक पांड्या एनसीएमध्ये राहिल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचवेळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याने टीमसोबत सराव केला होता. त्यावेळी टीम प्रशासनाने हार्दिकला एनसीएमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. एनसीएमध्.े रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर हार्दिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला तयार होईल.
हार्दिक पांड्याआधी जसप्रीत बुमराहने एनसीएऐवजी वैयक्तिक तज्ज्ञाची मदत घेऊन रिहॅबिलिटेशन केलं होतं, त्यामुळे बराच वाद झाला होता. पण प्रत्येक खेळाडूला रिहॅबिलिटेशनसाठी एनसीएमध्ये जावंच लागेल, अशी कठोर भूमिका बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतली होती.
मी द्रविडची भेट घेतली होती, आम्ही एक यंत्रणा बनवली आहे. बॉलरचा उपचार दुसऱ्या कोणी केला असेल तरी त्यांना एनसीएमध्ये जावं लागेल, असं गांगुली म्हणाला होता. हार्दिकची न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली नसली तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारत दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या उपलब्ध होईल.