बंगळुरु : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ३ वनडे मॅचची सीरिज २-१ने जिंकली. पहिल्या वनडे मॅचमध्ये १० विकेटने दारुण पराभव झाल्यानंतर भारताने सीरिजमध्ये जोरदार पुनरागमन केलं. पहिल्या वनडेवेळी ऋषभ पंतला बॅटिंग करताना दुखापत झाल्यामुळे केएल राहुलने तिन्ही मॅचमध्ये विकेट कीपिंग केली. तिन्हीवेळा राहुलने विकेट कीपिंग आणि बॅटिंग करताना उल्लेखनीय कामगिरी केली.
केएल राहुलच्या या कामगिरीचं कर्णधार विराट कोहलीने कौतुक केलं आहे. विराटच्या या वक्तव्यामुळे टीममधले विकेट कीपर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांची चिंता वाढणार आहे. केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेमध्ये ४७ रन, ८० रन आणि १९ रनची खेळी केली.
राहुलला विकेट कीपर केल्यामुळे टीमचं संतुलन चांगलं राहतं. ज्याप्रमाणे २००३ वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडने विकेट कीपिंग केल्यामुळे टीम संतुलित राहिली, तसंच राहुलच्याबाबतीतही आहे. राहुलने कीपिंग केल्यामुळे आम्हाला आणखी एक बॅट्समन खेळवण्याची संधी मिळेत, असं विराट म्हणाला. तसंच न्यूझीलंड दौऱ्यातल्या ५ टी-२० मॅच आणि वनडे मॅचमध्येही राहुलच विकेट कीपिंग करेल, असे संकेत विराटने दिले.
राहुलने चांगली कामगिरी केल्यामुळे आम्हाला त्याला घेऊनच खेळावं लागेल. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम-११ मध्ये बदल करण्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही, असं विराटने सांगितलं.