मुंबई : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार वेळा सिक्सची हॅट्रिक लगावणाऱ्या पंड्याने मॅच संपल्यानंतर म्हटलं की, 'सिक्स तर मी आधी पण मारायचो. आता फक्त अंतर इतकच आहे की, मी आता उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये सिक्स मारतो. मी लहानपणापासूनच सिक्स मारायचो. तुम्हाला वाटतं की, पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये माझा खेळ बदलला. तुम्हाला असं वाटतं तर अडचण नाही.'
पांड्याने पुढे म्हटलं की, याआधी आयपीएलमध्ये माझी कामगिरी चांगली होती. त्याआधी मी चांगली खेळी करु शकलो नव्हतो. मी मेहनत केली ज्यानंतर मी पुन्हा वापसी केली. मी स्वत:ला नेहमी प्रेरित करत असतो. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं. मला स्वता:वर विश्वास आहे. मी मैदाना बाहेर बॉल मारु शकतो. पंड्याने यावर्षी पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन सामन्यांमध्ये इमाद वसीम आणि शादाब खान तर श्रीलंकेविरोधात कँडी टेस्टमध्ये मालिंदा पुष्पकुमारला ३ बॉलमध्ये ३ सिक्स लगावले होते.
सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास असला की लांब सिक्स मारता येतो. जर मला वाटलं की सिक्स मारला पाहिजे तर मी खेळाचा अंदाज घेतो आणि लांब सिक्स मारतो असं देखील पांड्याने म्हटलं आहे.