मुंबई : २०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतला टीम इंडियाचा पहिला सामना बुधवार ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हार्दिक पांड्याची यंदाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरी ही निर्णायक असणार आहे. युवराज सिंहने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच प्रकारची कामगिरी हार्दिक पांड्या बजावेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी बॉलर ग्लेन मॅकग्राने व्यक्त केला आहे. २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये केलेल्या ऑलराऊंड कामगिरीमुळे युवराजला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पूरस्काराने गौरवण्यात आले होते.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये युवराजला स्थान दिले नाही. त्यामुळे टीममध्ये त्याची उणीव भासेल का? असा प्रश्न मॅकेग्राला करण्यात आला. यावर मॅकेग्रा म्हणाला की, ''टीममध्ये युवराजची भूमिका हार्दिक पांडया निभावेल. तसेच दिनेश कार्तिक देखील चांगला फिनीशर आहे. टीम इंडिया ही परिपूर्ण टीम आहे,' असे देखील मॅकेग्रा म्हणाला.
हार्दिक पांड्याने गेल्या काही मॅचमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली आहे. तर दिनेश कार्तिक हा वर्ल्ड कप टीममधील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
'टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह वनडेमधील सर्वश्रेष्ठ बॉलर आहे. तो डेथओव्हर स्पेशालिस्ट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॉलिंग करायची या बद्दल त्याला चांगली माहिती आहे. वर्ल्ड कपसाठी जशाप्रकारच्या टीमची गरज असते तशी टीम इंडिया आहे. इंग्लंडमधल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते कशाप्रकारची कामगिरी करतात हे पाहण्यासारखं असेल', अशी प्रतिक्रिया मॅकग्राने दिली.