साऊथम्पटन : २०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतला टीम इंडियाचा पहिला सामना बुधवार ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याआधी कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. हा वर्ल्ड कप माझ्या कारकिर्दीतली सगळ्यात मोठी परीक्षा आहे, असं विराट कोहली म्हणाला.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने निराशाजनक कामगिरी केली आहे. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 'कोणत्याच टीमला आम्ही कमजोर समजत नाही. त्यांच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची टीम धोकादायक असते. आम्हाला आमच्या ताकदीने खेळावं लागेल,' असं वक्तव्य विराटने केलं.
कुलदीप यादवचा फिटनेस आणि फॉर्मवरही कोहलीने भाष्य केलं. 'कुलदीप नेटमध्ये चांगली बॉलिंग करतोय. कुलदीप यादवने टाकलेला प्रत्येक बॉल स्टम्पला लागतोय. केदार जाधव टीमला योग्य संतुलन देतो,' असं विराटने सांगितलं.
वर्ल्ड कपमधल्या पहिल्या दोन मॅच गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं मनोबल खचलं आहे. त्यातच फास्ट बॉलर डेल स्टेन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. स्टेनऐवजी डावखुरा फास्ट बॉलर ब्युरन हेन्ड्रिक्सची दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फास्ट बॉलर लुंगी एनगिडीलाही बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापत झाली होती. तर इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये जोफ्रा आर्चरने हाशिम आमलाच्या डोक्यावर बॉल मारला होता. यानंतर आमला बांगलादेशविरुद्धची मॅच खेळला नाही.