हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच, ५५ बॉलमध्ये ठोकले १५८ रन

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच आहेत.

Updated: Mar 6, 2020, 05:39 PM IST
हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच, ५५ बॉलमध्ये ठोकले १५८ रन title=

नवी मुंबई : दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच आहेत. डीवाय पाटील टी-२० कपमध्ये हार्दिकने पाच दिवसांमध्ये दुसरं शतक केलं आहे. हार्दिकने रिलायन्स-१ कडून खेळताना बीपीसीएलविरुद्ध १५८ रनची खेळी केली. या खेळीमध्ये पांड्याने २० शानदार सिक्स आणि ६ फोर लगावले.

हार्दिक पांड्याने ५५ बॉलमध्ये १५८ रनची खेळी केली. हार्दिकच्या या खेळीमुळे रिलायन्स-१ने २३८ रनचा स्कोअर केला. या दोन शतकांसोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आपण तयार असल्याचंही हार्दिकने दाखवून दिलं आहे. ३ वनडे मॅचची ही सीरिज १२ मार्चपासून सुरु होणार आहे.

हार्दिक पांड्याची या स्पर्धेतली ही तिसरी मॅच होती. याआधी मंगळवारी सीएजीविरुद्ध पांड्याने ३९ बॉलमध्ये १०५ रन केले होते. हार्दिकच्या या खेळीमध्ये ८ फोर आणि १० सिक्स होते. पांड्याने त्या मॅचमध्ये ५ विकेटही घेतल्या होत्या. स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये पांड्याने २५ बॉलमध्ये ३८ रन केले होते.

डीवाय पाटील टी-२० कपमध्ये हार्दिक पांड्याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनही खेळत आहेत. हे तिन्ही खेळाडू दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याची लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.