स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.

Updated: Jul 24, 2018, 04:06 PM IST
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण  title=

मेलर्बन : स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनं याबाबत बातमी दिली आहे. आयपीएलदरम्यान भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांना मी मैदानात होणाऱ्या संशयास्पद गोष्टींची कल्पना दिल्याचंही मॅक्सवेल म्हणाला. अल जजीरानं काही दिवसांपूर्वी स्पॉट फिक्सिंगबद्दलची एक डॉक्यूमेंट्री बनवली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. २०१७ साली रांचीमध्ये झालेल्या टेस्ट मॅचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचं या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात आलं. याच टेस्ट मॅचमधून मॅक्सवेलनं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. या मॅचमध्ये मॅक्सवेलनं पहिलं शतक झळकावलं होतं.

अल जजीराच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये मॅक्सवेलचं नाव घेण्यात आलेलं नाही पण मॅच फूटेडमुळे मॅक्सवेलवर संशय घेण्यात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही मॅक्सवेलला या डॉक्यूमेंट्रीच्या प्रसारणाची माहिती दिली. पण भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी याबाबत माझी चौकशी केली नाही, असं मॅक्सवेल म्हणाला.

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर मी हैराण झालो आणि मला दु:खही झालं. ज्या खेळामुळे आपल्याला ओळख मिळाली त्यामुळेच आपल्यावर आरोप होत असतील तर दु:ख होणं स्वाभावीक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यावर शतक केलेला क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मी स्टिव्ह स्मिथला मिठी मारली होती, असं मॅक्सवेल एसईएन रेडियोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. माझ्यावर लागलेले आरोप निराशाजनकर आहेत. यामध्ये कोणतंही तथ्य नाही. हे आरोप १०० टक्के चूक आहेत, अशी प्रतिक्रिया मॅक्सवेलनं दिली.