मुंबई : भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीसंत त्याच्या बॉडीवर प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. श्रीसंतचे हे व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. श्रीसंत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे व्हिडिओ शेअर करत आहे. नुकताच श्रीसंतनं आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. मेहनत, निष्ठा, दृढ संकल्प, अनुशासन, लाईफस्टाईल, असं श्रीसंत हा व्हिडिओ शेअर करताना म्हणाला आहे.
जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा लूक श्रीसंतनं शेअर केला होता. या लूकमुळे श्रीसंत WWEच्या आखाड्यात उतरणार का याची चर्चा सुरु झाली होती. पण आता श्रीसंतच्या या फिटनेसचं कारण समोर आलं आहे. श्रीसंत आता एक कन्नड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. केम्पागोडा-२ असं या चित्रपटाचं नाव असून श्रीसंत यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटासाठीच श्रीसंत या नव्या लूकमध्ये दिसत आहे.
याआधी श्रीसंतनं बॉलीवूड चित्रपटातही काम केलं होतं. अक्सर-२ या चित्रपटातून श्रीसंत मोठ्या पडद्यावर झळकला होता. मोठ्या पडद्यावर श्रीसंतचं हे पदार्पण होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.
२०१३ सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयनं श्रीसंतचं निलंबन केलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान श्रीसंतला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. पण बीसीसीआयनं पुन्हा याचिका दाखल केल्यानंतर श्रीसंतला झटका लागला. यानंतर श्रीसंतनं सर्वोच्च न्यायालयात जायच्या हालचाली सुरु केल्या. बीसीसीआयनं श्रीसंतवर लावलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंतनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.