नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं मागच्याच आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशविरुद्धची रणजी मॅच गंभीरची शेवटची मॅच ठरली. दिल्लीकडून खेळताना गौतम गंभीरनं या मॅचमध्ये शतक झळकवत क्रिकेटला अलविदा केलं. गंभीरचं घरचं मैदान असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानात हा सामना झाला. आता गौतम गंभीरनं त्याच्या निवृत्तीचं कारण सांगितलं आहे. ईएसपीएनला गौतम गंभीरनं मुलाखत दिली आहे. राष्ट्रीय टीममध्ये निवडच होत नव्हती, तर रन बनवत राहणं आणि खेळत राहण्यात काहीच अर्थ नव्हता असं गंभीर म्हणाला.
गौतम गंभीरनं २०१६ साली इंग्लंडविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळली. तर इंग्लंडविरुद्धच २०१३ साली त्यानं शेवटची वनडे खेळली. २०१६ नंतर गंभीरला भारतीय टीममध्ये संधी मिळाली नाही. पण टीममध्ये पुनरागमन होईल अशी आशा इतके दिवस गंभीरला होती.
काश मी २७ वर्षांचा असतो पण मी आता ३७ वर्षांचा आहे आणि आता माझ्याकडे करण्यासारखं काहीच राहिलं नाही. जर तुमच्या रन तुम्हाला पुढे घेऊन जात नसतील तर त्या करण्यात काहीच अर्थ नसतो. यापेक्षा एका तरुण खेळाडूला संधी द्यावी. तो रन बनवून भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न तरी पूर्ण करेल. याचा विचार करून निवृत्ती घेतली असल्याची प्रतिक्रिया गंभीरनं दिली.
मी रन करीन तेव्हा कधी ना कधी मला पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये स्थान मिळेल, असा विचार मी केला होता. पण माझा हा प्रयत्न मला पुढे घेऊन जात नव्हता आणि माझी राष्ट्रीय टीममध्ये निवड होत नव्हती, म्हणून मी हा प्रयत्न करण्याचं सोडून दिलं, असं गंभीर म्हणाला.
भारतानं २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला. या दोन्ही वर्ल्ड कप फायनलमध्ये गौतम गंभीर भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. गौतम गंभीरनं ५८ टेस्टमध्ये ४१.९५ च्या सरासरीनं ४,१५४ रन तर १४७ वनडेमध्ये ३९.६८च्या सरासरीनं ५,२३८ रन केले. गंभीरनं भारताकडून ३७ टी-२० मॅचही खेळल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये गंभीरच्या नावावर ९ शतकं आणि वनडेमध्ये ११ शतकं आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये गंभीरनं ७ अर्धशतकं केली.
आपल्या २० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत गंभीर भारताबरोबरच दिल्ली, दिल्ली डेअरडेव्हिल्स, एसेक्स, कोलकाता नाईटरायडर्सकडून मॅच खेळल्या. गंभीर कर्णधार असताना कोलकाता नाईटरायडर्सनं दोनवेळा आयपीएल जिंकली होती. गौतम गंभीर दिल्लीची रणजी टीम आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमचा कर्णधार होता.