भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी नवखा खेळाडू यशस्वी जैसवालला दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेदरम्यान सल्ला दिला होता. वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सहजपणे विकेट गमावल्याने सुनील गावसकर यांनी यशस्वी जैसवालला सुनावलं होतं. त्रिनिनाद येथे हा सामना झाला होता. आपल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तो तीन अंकी धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण त्याने बाहेर जाणारा चेंडू खेळला आणि 57 धावांवर झेलबाद झाला.
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत यशस्वी जैसवाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैसवालने 5 सामन्यात 712 धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजने इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यशस्वी जैसवालने इंग्लंडविरोधात मोठी धावसंख्या उभारलेली पाहून बरं वाटल्याचं गावसकर म्हणाले आहेत. तसंच आपण दिलेल्या सल्ल्याची माहिती दिली.
"यशस्वीने ज्याप्रकारे धावा केल्या आणि वर्चस्व गाजवलं ते पाहून फार बरं वाटलं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान लिफ्टमध्ये मी त्याला थोडंसं ओरडलो होतो. त्रिनिनाद येथील कसोटी सामन्यात अर्धशतक केल्यानंतर आपली विकेट सोडल्याने मी नाराजी व्यक्त केली होती. मी त्याला गोलंदाजाला कधीच अशी मदत करु नको असं सांगितलं होतं. सुदैवाने त्याने सल्ला ऐकला आणि दोन शतकं ठोकली," असं सुनील गावसकर 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
सुनील गावसकर यांनी 1971 मध्ये पदार्पणातील कसोटी मालिकेत 700 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यासंबंधी बोलताना सुनील गावसकर यांनी नशिबाची आपल्याला मोठी साथ मिळाल्याचं सांगितलं. "जर एखादा खेळाडू मालिकेत धावा करत असेल तर तो चांगला तरी आहे किंवा नशीबवान आहे. माझ्या वेळी नशिबाची साथ होती," असं गावसकर म्हणाले आहेत.
यशस्वी जैसवालने दोन दुहेरी शतकांसह तीन अर्धशतकंही ठोकली आहेत. त्यावर बोलताना गावसकर यांनी सांगितलं की, "त्याने तीन अर्धशतकं ठोकली आणि मी दिलेला सल्ला विसरुन गेला. पण आपल्या तारुण्यात 20 वर्षांचे असतो तेव्हा कुठे काही ऐकण्याच्या स्थितीत असतो. मीदेखील असाच होतो. आशा आहे की, तो आता मोठ्या खेळी करेल आणि आपण जे काही आहोत ते क्रिकेटमुळे हे विसरणार नाही".
दरम्यान, यशस्वी जैसवालला मंगळवारी आयसीसीचा फेब्रुवारीमधील 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 22-वर्षीय खेळाडूने फेब्रुवारीमध्ये अनेक विक्रम रचले आणि राजकोटच्या दुहेरी शतकादरम्यान कसोटी डावात सर्वाधिक षटकार (12) मारण्याच्या कसोटी विक्रमाची बरोबरी केली.