भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची वेळ आली. टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय क्रिकेट संघ काही मोजके टी-20 सामने खेळणार असून, हा मालिका त्याच तयारीचा भाग आहे. त्यामुळेच पावसामुळे सामना रद्द होणं भारतीय संघासाठी मोठं नुकसान आहे. आता भारतीय संघााकडे फक्त पाच टी-20 सामने आहेत. यामधील 2 दक्षिण आफ्रिका आणि 3 अफगाणिस्तानविरोधात खेळले जाणार आहेत. जानेवारी महिन्यात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सामने होतील. यानंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्डकप खेळला जाईल.
टी-20 वर्ल्डकपआधी आयपीएल होणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी अंतिम 15 ची निवड करताना भारतीय संघाची निवड समिती त्यावर अवलंबून असेल.
रिंकू सिंग, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग यांचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा असून, आपल्या कामगिरीने सर्वांवर छाप पाडण्यासाठी उत्सुक असतील. पण आता त्यांनी सेंट जॉर्ज पार्क येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी त्यांना मंगळवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. याशिवाय सुर्युकमार यादवही विजयासह सुरुवात करण्याची अपेक्षा करत असेल, जेणेकरुन कर्णधारासाठी त्याच्या नावाचा विचार केला जावा.
पण पावसाने व्यत्यय आणल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांना फारशी संधी मिळाली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पावसामुळे सामना थांबत असेल तर क्रिकेट साऊथ आफ्रिका फार काही करु शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. पण यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
"एकदा वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही निसर्गाशी लढू शकत नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने अशा स्थितीत काहीच करु शकत नव्हती. पण मी जे पाहिले त्यावरून असं दिसतंय की, फक्त दक्षिण आफ्रिका नाही तर अनेक देश एक काम करु शकतात. दक्षिण आफ्रिका आणि इतर देश अशा स्थितीत मैदानं पूर्णपणे झाकून टाकू शकतात. सर्व बोर्डांकडे भरपूर पैसे आहेत. आपल्याकडे बीसीसीआयइतके पैसे नाहीत असं ते म्हणत असले तरीही," असं सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले.
गावसकर ज्याचा संदर्भ देत होते ते म्हणजे डर्बन येथे पावसाचा जोर कमी झालेला नसतानाही संपूर्ण मैदान झाकलेले नव्हते. "अनेकदा असं होतं की, पाऊस थांबतो आणि ते मैदान तयार करण्यासाठी एक तास घेतात अन् पुन्हा पाऊस येतो. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे बोर्डाने लक्ष दिलं पाहिजे. पण या जागेची निवड केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेला जबाबदार धरु शकत नाही," असं सुनील गावसकरांनी स्पष्ट केलं.