Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत (Ind vs Aus ODI Series) भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सपशेल अपयशी ठरला. सूर्यकुमार यादव तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. यामुळे त्याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही झाला आहे. मात्र असं असतानाही रोहित शर्माने (Rohit Sharma) सूर्यकुमार यादवची पाठराखण केली असून आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. यावरुन भारताच्या माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे.
सूर्यकुमार यादवला 360 डिग्री प्लेअर म्हणून ओळखलं जातं. सूर्यकुमार यादव मैदानात कोणत्याही दिशेला सहजपणे फटके लगावू शकतो. टी-20 सामन्यांमध्ये त्याने केलेल्या कामगिरीनंतर त्याचं 360 डिग्री प्लेअर असं कौतुक करण्यात आलं होतं. टी-20 मध्ये तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र एकदिवसीय सामन्यात तो या कामगिरीची पुनरावृत्ती कऱण्यात अपयशी ठरला आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर 270 धावांचं आव्हान होतं. या सामन्यात सूर्यकुमार यादव पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच अपयशी ठरला आणि शून्यावर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादववर सर्व स्तरातून टीका होत असून काहींनी तर त्याच्या एकदिवसीय संघातील स्थानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
भारताचे माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ट्विट करत सूर्यकुमार यादवला वारंवार संधी देत असल्याने संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. "काही मोजक्या खेळाडूंनाच संऱक्षण दिलं जात आहे आणि याचं सूर्यकुमार यादव उत्तम उदाहरण आहे. टी-20 क्रिकेट हे 50 ओव्हर्सच्या क्रिकेटपेक्षा वेगळं आहे. लाल चेंडू आणि सफेद चेंडू हे दोन्ही वेगळे आहेत. ओह...सूर्यकुमार यादव हा कसोटी संघाचा भाग होता. टी-20 मधील कामगिरीच्या आधारे तुम्ही सर्व फॉरमॅटसाठी खेळाडूची निवड करु शकत नाही," असं ते म्हणाले आहेत.
Fine example of how only certain players get protection, SKY great example. T20 cricket is different from 50 overs cricket. Just don’t segregate Red ball and white ball cricket. Oh SKY was part of the Test team. You can’t pick a player based on T20 performance for all formats
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 22, 2023
"नवीन आणि वेगळं काहीतरी करण्यासाठी उत्तम क्षमतेची गरज असते. पण जर तुम्ही एकाच प्रकारे खेळणार असाल तर तुम्ही ५० षटकांचे किंवा कसोटी सामने यामध्ये सापडले जाणारा. असो, सर्वांना शुभ सकाळ," असं ते दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
It requires great ability to be innovative but if that is the only way you play, you will get found out in slightly longer formats, be it 50 overs or Test matches. Anyway, GOOD MORNING ALL.
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 22, 2023
सूर्यकुमार यादवच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 21 सामन्यात 433 धावा केल्या आहेत. म्हणजे प्रत्येक सामन्यात त्याची 24 धावांची सरासरी आहे.