Why Pakistan Is Above India In Paris Olympics 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेमध्ये भारताचा नीरज चोप्रा सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी करेल अशी अपेक्षा भारतीयांना होता. मात्र नीरजला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. मात्र त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदावर नाव कोरलं आहे. मागील 32 वर्षांपासून पाकिस्तानने ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं नव्हतं. हा दुष्काळ नदीमने संपवला आहे. मात्र त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. 1992 मध्ये बार्सलोना ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानी हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पाकिस्तानला एकही सुवर्ण पदक जिंकता आलं नव्हतं. विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने केवळ सात खेळाडू पाठवले आहेत. त्यापैकी केवळ नदीमलाच पदक मिळवण्यात यश आलं आहे.
दुसरीकडे नीरज चोप्रा हा भारतासाठी पाचवा पदक विजेता ठरला. आज ऑलिम्पिक्सचा शेवटचा दिवस असून भारताच्या नावावर एकूण सहा पदकं आहेत. तर 27 वर्षीय नदीमला मिळालेलं पजक हे पाकिस्तानला यंदा जिंकता आलेलं एकमेव पदक आहे. मात्र सहा पदकं जिंकूनही भारत मेडल्सच्या टॅलीमध्ये केवळ एक पदक जिंकणाऱ्या पाकिस्तानपासून तब्बल 9 स्थानं खाली आहे. असं का? हेच जाणून घेऊयात...
सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 11 ऑगस्ट रोजीच्या (भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजेपर्यंत) आकडेवारीनुसार भारत हा 71 व्या स्थानी आहे. भारताच्या नावावर एक रौप्य आणि पाच कांस्य पदकं आहेत. तर याच यादीमध्ये एक मेडल जिंकणारा पाकिस्तान मात्र 62 व्या स्थानी आहे.
ऑलिम्पिक्समध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांचे क्रमांक हे त्या देशाने किती सर्वोच्च पदकं जिंकली आहेत यावर अवलंबून असतं. म्हणजेच या यादीचा विचार करताना सर्वात आधी सुवर्ण पदकांचा विचार केला जातो. त्यानंतर रौप्य आणि शेवटी कांस्य पदकांचा विचार होतो. म्हणजेच ज्या देशांना सुवर्ण पदकं अधिक ते अव्वल स्थानी आणि ज्यांना कमी ते तळाकडे असा हिशोब असतो. म्हणूनच केवळ एक पदक पाकिस्तानकडे असलं तरी ते सुवर्ण पदक असल्याने त्यांचा क्रमांक हा सहा पदक असलेल्या भारतापेक्षा वर आहे. भारताकडे एक रौप्य आणि पाच कांस्य पदकं आहेत. भारताकडे एक जरी सुवर्ण पदक असतं तरी भारत पाकिस्तानहून सरस असता. किंवा नदीमला रौप्य पदक मिळालं असतं आणि नीरजने सुवर्ण पदक पटकावलं असतं तर भारत या यादीमध्ये पाकिस्तानपेक्षा सरस ठरला असता. आता भारत आणि पाकिस्तानी दोघांकडेही प्रत्येकी एक सुवर्ण किंवा रौप्य पदक असतं तरी भारतच पाकिस्तानपेक्षा या यादीत वरच्या स्थानी राहिला असता. कारण दोन्ही देशांकडे समसमान सुवर्ण किंवा रौप्य पदकं असतील तर कोणाला किती कांस्य पदकं आहेत यावर देशाचं स्थान निश्चित होतं.