World Cup Final आधीच कर्णधाराचा राजकारणात गुपचूप प्रवेश; PM कडून वृत्ताला दुजोरा, निवडणूक लढवणार

World Cup Final This Captain Enters Politics: वर्ल्ड कपचा सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. मात्र त्याच्या एक दिवस आधीच कर्णधाराने उमेदवारी अर्जाचा फॉर्म घेतल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 20, 2023, 09:44 AM IST
World Cup Final आधीच कर्णधाराचा राजकारणात गुपचूप प्रवेश; PM कडून वृत्ताला दुजोरा, निवडणूक लढवणार title=
खेळापेक्षा वादामुळे राहिला चर्चेत

World Cup Final This Captain Enters Politics: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायलनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघाला 6 विकेट्स राखून पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने अहमदाबादच्या मैदानावर सव्वा लाख भारतीय प्रेक्षकांसमोर सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. मात्र हा सामना होण्याआधी याच वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेल्या एका कर्णधाराने थेट राजाकरणात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला पंतप्रधानांनीही दुजोरा दिला आहे.

काय माहिती आली समोर?

बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार शाकिब अल हसनने राजकारणामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. शाकिब अल हसन सध्या सत्तेत असलेल्या बांगलादेश अवामी लीग पक्षाकडून आगामी सार्वत्रिक निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान 7 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अवामी लीगचे सहसचिव बहाउद्दीन नसीम यांनी एफएफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, शाकिबने शनिवारी उमेदवारी अर्जाचा फॉम पक्ष कार्यालयामधून घेतला आहे. या निवडणुकीमधील 3 जागा सत्ताधारी पक्ष लढवणार असून एका जागेवरुन शाकिबला उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. "तो एक सेलिब्रिटी आहे. देशातील तरुणांमध्ये त्याची चांगली क्रेझ आहे," असं नासिम यांनी शाकिबचं पक्षात स्वागत करताना म्हटलं आहे. शाकिब अल हसन हा वर्ल्ड कपमधील मैदानातील खेळाऐवजी वादामुळेच चर्चेत राहिला.

कुठून लढणार?

शाकिब अल हसनने पक्षात प्रवेश केल्याच्या वृत्ताला विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या संसदीय बोर्डाने दुजोरा दिला आहे. या बोर्डाचं नेतृत्व पंतप्रधान शेख हसिना करतात. शाकिब हा राजधानी ढाका मतदारसंघातून किंवा त्याचं मूळ गाव असलेल्या नैऋत्येमधील मागूरा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतो, असंही नासिम यांनी स्पष्ट केलं.

पुन्हा सत्ताधारीच जिंकणार

17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशचं नेतृत्व मागील 15 वर्षांपासून शेख हसिना करत आहेत. शेख हसिना या त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहेत. विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यास त्या सलग चौथ्यांदा सत्तेत येणं निश्चित मानलं जात आहे. 

निवृत्त होण्याआधीच राजकारणात

शेख हसिना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचा चांगला आर्थिक विकास झाला आहे. मात्र पाश्चिमात्य देशाने या आर्थिक विकासासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांनाही शेख हसिना यांच्यावर मतदानामध्ये फेरफार केल्याचे आरोप केले आहेत. दक्षिण आशियामध्ये अशाप्रकारे एखाद्या क्रिकेटपटूने राजकारणात प्रवेश करणं काही नवीन गोष्ट नाही. श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, भारताचा गौतम गंभीर, मोहम्मद अझरुद्दीन यासारखे माजी क्रिकेटपटू राजकारणात सक्रीय आहेत. मात्र क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी राजकारणात प्रवेश करणारा साकीब अल हसन हा बहुदा पहिलाच क्रिकेटपटू आहे.