'त्याबद्दल बोलणंही मूर्खपणाचं'; श्रीसंतच्या आरोपांना कार्तिकचं प्रत्युत्तर

भारताचा क्रिकेटपटू एस श्रीसंत याने केलेल्या आरोपांवर दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Oct 22, 2019, 05:12 PM IST
'त्याबद्दल बोलणंही मूर्खपणाचं'; श्रीसंतच्या आरोपांना कार्तिकचं प्रत्युत्तर title=

चेन्नई : भारताचा क्रिकेटपटू एस श्रीसंत याने केलेल्या आरोपांवर दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय क्रिकेट टीममधून मला बाहेर काढण्याला दिनेश कार्तिक जबाबदार आहे, असा आरोप श्रीसंतने केला होता. या आरोपांबद्दल बोलणंही मुर्खपणाचं आहे, अशी प्रतिक्रिया दिनेश कार्तिकनी हिंदू या वृत्तपत्राला बोलताना दिली. दिनेश कार्तिककडे कधीच भारतीय टीमची निवड करण्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार नव्हते. तसंच कार्तिकचं स्वत:चं स्थानही टीममध्ये निश्चित नव्हतं, त्यामुळे श्रीसंतचे आरोपांमध्ये तथ्य काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वादामध्ये अडकण्याची श्रीसंतची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतवर ऑगस्ट २०१३ साली क्रिकेट खेळण्यासाठी आयुष्यभराची बंदी घालण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची ही बंदी उठवली, पण त्याला निर्दोष सोडलं नाही. हा खटला योग्य पद्धतीने हाताळला गेला नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. तसंच श्रीसंतवरच्या बंदीचा पुनर्विचार करायला न्यायालयाने बीसीसीआयला ३ महिन्यांचा कालावधी दिला.

आपल्यावर झालेले आरोप निराधार आहेत, तसंच आपण निर्दोष असल्याचं श्रीसंत म्हणाला. श्रीसंतने भारताकडून २७ टेस्ट, ५३ वनडे आणि १० टी-२० मॅच खेळल्या. या सगळ्या मॅचमध्ये त्याने एकूण १६९ विकेट घेतल्या. २०११ साली श्रीसंत भारताकडून शेवटचा खेळला.

स्पॉट फिक्सिंगबरोबरच आयपीएलमध्ये हरभजन आणि श्रीसंतमध्ये मोठा वाद झाला होता. २००८ सालच्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानफटात मारली होती. तसंच राजस्थानसोबत असताना श्रीसंत आणि प्रशिक्षक पॅडी अप्टन यांचंही भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.