नवी दिल्ली : एमएस धोनीची क्रिकेट कारकिर्द यंदाच्या आयपीएलवर अवलंबून होती. कोरोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम पुढे ढकलण्यात आला आहे. भारतातली आत्ताची परिस्थिती बघता सध्या तरी आयपीएल होणं अशक्य आहे. त्यामुळे धोनीचं भविष्यही संकटात सापडलं आहे. जुलै महिन्यात २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनी मैदानात दिसलेला नाही.
धोनीची निवड आता कोणत्या आधारावर करायची? असा सवाल भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विचारला आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार धोनीला आहे, पण आता धोनीच्या पुनरागमनाची शक्यता अत्यंत धूसर आहे, कारण जवळपास वर्षभर तो क्रिकेट खेळलेला नाही, असं मत गौतम गंभीरने मांडलं.
'जर यावर्षी आयपीएल स्पर्धा झाली नाही, तर धोनीचं पुन्हा खेळणं कठीण आहे. मागचं वर्ष-दीड वर्ष तो क्रिकेट खेळत नसेल, तर त्याची निवड कोणत्या आधारावर करायची? तुम्ही भारतासाठी खेळता, त्यामुळे जो चांगला खेळेल, त्यालाच संधी दिली पाहिजे. निवृत्त होणं हा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल,' असं गंभीर म्हणाला.
वर्ल्ड कप संपल्यानंतर धोनीने बीसीसीआयकडे २ महिन्यांच्या विश्रांतीची विनंती केली. या विश्रांतीनंतरही धोनी मैदानात आला नाही. आयपीएलसाठी धोनीने चेन्नईच्या मैदानात सरावालाही सुरुवात केली होती, पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली.
धोनीच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलने चांगली कामगिरी केली असल्याचं गंभीर म्हणाला. धोनीची जागा केएल राहुल घेऊ शकतो. केएल राहुलची विकेट कीपिंग आणि बॅटिंग मी बघितली आहे. धोनीएवढी राहुलची कीपिंग चांगली नाही, पण तुम्ही टी-२० क्रिकेट म्हणून बघत असाल, तर राहुल योग्य आहे, अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.