इंग्लंड दौराच धोनीसाठी अडचणीचा ठरतो

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचं नाव नेहमीच घेतलं जाईल. 

Updated: Jul 19, 2018, 07:16 PM IST
इंग्लंड दौराच धोनीसाठी अडचणीचा ठरतो  title=

मुंबई : भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचं नाव नेहमीच घेतलं जाईल. पण सध्या धोनी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर इंग्लंड दौऱ्यामध्ये मात्र धोनी एक-एक रनसाठी संघर्ष करताना दिसला. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संथ बॅटिंग केल्यामुळे धोनीवर टीकेची झोड उठली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. तर दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. वनडे सीरिजमध्ये धोनीनं २ मॅचमध्ये ३९ ची सरासरी आणि ६३ च्या स्ट्राईक रेटनं ७९ रन केल्या. पण इंग्लंड दौऱ्यावेळी झालेली धोनीची ही पहिलीच अडचण नाही. याआधीचा इंग्लंड दौराही धोनीसाठी खराबच ठरला होता.

धोनीच्या नेतृत्वात भारतानं देश आणि परदेशात शानदार कामगिरी केली होती. पण इंग्लंडच्या जमिनीवर धोनीची नेहमीच कठीण परीक्षा होती. धोनीच्या नेतृत्वात भारतानं दोनवेळा इंग्लंडचा दौरा केला. यामध्ये भारतानं ९ टेस्ट खेळल्या. यातल्या ७ टेस्ट भारतानं गमावल्या. एका टेस्टमध्ये विजय तर एक टेस्ट ड्रॉ झाली. या दौऱ्यांमध्ये धोनीचा सर्वाधिक स्कोअर होता ८२ रन.

२०११ साली भारताचा ४-०नं पराभव

धोनीच्या नेतृत्वात २०११ सालच्या इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ४-०नं पराभव झाला. खुद्द महेंद्रसिंग धोनीनं ८ इनिंगमध्ये २ अर्धशतकं केली होती.

२०१४ सालच्या दौऱ्यावेळी वाद

२०१४ सालच्या इंग्लंड दौराही वादात सापडला होता. ऑगस्ट २०१४ साली झालेल्या या दौऱ्यामध्ये धोनी भारताचा कर्णधार होता तर डंकन फ्लेचर प्रशिक्षक होते. या दौऱ्यातल्या लाजीरवाण्या पराभवामुळे बीसीसीआयनं रवी शास्त्रीची व्यवस्थापक म्हणून निवड केली. आता टीममधल्या सगळ्या गोष्टी मी स्वत:च बघीन आणि प्रशिक्षकही मलाच माहिती देईल, असं शास्त्री म्हणाला होता. पण धोनीनं या सगळ्याला नकार दिला आणि फ्लेचरच टीमचा बॉस असेल, असं धोनी म्हणाला. धोनीच्या या वक्तव्यानं बीसीसीआयही नाराज झाली होती. धोनी प्रशिक्षकची निवड करू शकत नाही. याचा अधिकार बीसीसीआयलाच आहे, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं होतं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीनं सोडंल कर्णधारपद

यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताची कामगिरी निराशाजनक झाली. यानंतर धोनीनं कर्णधारपद सोडलं. पण याची सुरुवात इंग्लंडमधूनच झाली होती. धोनी, डंकन फ्लेचर आणि रवी शास्त्रीचा वादही याला कारणीभूत होता.

पुढचा वर्ल्ड कपही इंग्लंडमध्येच

२०१९ साली होणारा वर्ल्ड कपही इंग्लंडमध्येच आहे. या वर्ल्ड कपसाठी धोनी टीममध्ये असेल असं कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीनं याआधीच स्पष्ट केलं आहे. पण धोनीचा फॉर्म बघता हे दोघं आणखी किती काळ त्याला पाठिंबा देणार हा खरा प्रश्न आहे.