म्हणून धोनीनं अंपायरकडून बॉल घेतला, रवी शास्त्रीचं स्पष्टीकरण

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला.

Updated: Jul 19, 2018, 06:15 PM IST
म्हणून धोनीनं अंपायरकडून बॉल घेतला, रवी शास्त्रीचं स्पष्टीकरण title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला. या सीरिजनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय. दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं केलेल्या संथ फलंदाजीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तसंच तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर धोनीनं अंपायरकडून बॉल मागून घेतला. २०१४ मध्ये टेस्ट निवृत्त होण्याआधी त्यानं असाच प्रकार केला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आलं. या सगळ्या चर्चानंतर भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्रीनं प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या रवी शास्त्रीनं फेटाळून लावल्या आहेत. धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. धोनीनं अंपायरकडून बॉल घेतल्याचं कारणही रवी शास्त्रीनं सांगितलं आहे. धोनीनं बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासाठी अंपायरकडून बॉल घेतल्याचं रवी शास्त्रीनं स्पष्ट केलं. इंग्लंडमधल्या वातावरणाचा अंदाज यावा हे पाहण्यासाठी भरत अरुणला बॉल किती घासला गेला आहे हे पाहायचं होतं, असं रवी शास्त्रीनं सांगतिलं.

धोनीची संथ बॅटिंग

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संथ बॅटिंग केल्यामुळे धोनीवर टीकेची झोड उठली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. तर दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.