धोनीचा आणखी एक विक्रम, अजहरचं हे रेकॉर्ड मोडलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनं विजय झाला आहे.

Updated: Sep 18, 2017, 04:36 PM IST
धोनीचा आणखी एक विक्रम, अजहरचं हे रेकॉर्ड मोडलं title=

चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनं विजय झाला आहे. या मॅचमध्ये धोनीनं ७९ रन्सची खेळी करून भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. या मॅचमध्ये अर्धशतक केल्यानंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० अर्धशतकं करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

याचबरोबर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,७४६ रन्स पूर्ण केल्या आहेत. अजहरचं हे रेकॉर्ड धोनीनं मोडलं आहे. चेन्नईमधल्या वनडेआधी धोनी अजहरच्या या रेकॉर्डपासून २२ रन्स दूर होते. अजहरनं १५,५९३ रन्स बनवले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीयांमध्ये धोनी पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीयांमध्ये सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,३५७ रन्स बनवल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड, तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि चौथ्या क्रमाकांवर वीरेंद्र सेहवाग आहे.

द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४,२०८ रन्स, गांगुलीनं १८,५७५ रन्स आणि सेहवागनं १७,२५३ रन्स बनवल्या आहेत. याआधी श्रीलंका दौऱ्यावर धोनीनं अजहरच्या वनडेमधल्या रन्सचं रेकॉर्डही तोडलं होतं. अजहरच्या नावावर वनडेमध्ये ९,३७८ रन्स होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ८७ बॉल्समध्ये ६७ रन्सची खेळी करून हे रेकॉर्ड तोडलं होतं.

धोनीनं आत्तापर्यंत १४४ टेस्ट इनिंगमध्ये ४,८७६ रन्स, वनडेमध्ये २०६ इनिंगमध्ये ९,७३७ रन्स आणि टी-20मध्ये ६८ इनिंगमध्ये १,२१२ रन्स बनवल्या आहेत.